पुणे : कुठल्या आधाराविना इतिहासात बदल करण्याबरोबरच अवमानकारक मिथक आणि असत्य पसरविण्यात यात बौद्धिक हननाची विविध रूपे आपल्याला सध्याच्या परिस्थितीत दिसून येत आहेत. राष्ट्रगीत, झेंडा, गोमाता, सणांचे स्तोम, भव्य पुतळे, जाहिराती, फलक यांच्या माध्यमातून ‘सांस्कृतिक हिंसा’ पसरविण्याचे काम एका अंधारनीतीचे सुरू आहे. ही हिंसा उघडकीस येऊ नये म्हणून परिस्थितीला धुसर ठेवायचे. माध्यमांना हाताशी घेण्याचा प्रकार सुरू आहेत. त्याविरोधात कुणी ब्र काढण्याची हिंमत दाखवल्यास त्यांच्यावर ‘अर्बन नक्सली’चा शिक्का मारायचा. हे सगळे अंधार गडद करण्यासाठी लोकांच्या डोळ्यांवर पट्ट्या बांधण्याचे काम सुरू आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ दिग्दर्शक अमोल पालेकर यांनी सध्याच्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक परिस्थितीवर मार्मिक भाष्य केले.महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका), केशव गोरे स्मारक ट्रस्ट (मुंबई) व साधना ट्रस्ट (पुणे) यांच्या वतीने संयुक्तपणे साहित्य व समाजकार्य पुरस्कार २०१८ चे वितरण केले. बालगंधर्व रंगमंदिर येथे पार पडलेल्या पुरस्कार सोहळ्याला ज्येष्ठ लेखिका व अनुवादक शांता गोखले (साहित्य जीवनगौरव), डॉ. विकास आमटे (समाजकार्य जीवनगौरव), राजिंदर भदौठ (डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार), सानिया (साहित्य : वाङ्मयप्रकार पुरस्कार), राजीव नाईक (रा. शं. दातार नाट्यपुरस्कार), प्रवीण बांदेकर (ललित ग्रंथ पुरस्कार), हरी नरके (समाजप्रबोधन पुरस्कार), निशा शिवूरकर (कार्यकर्ता पुरस्कार, असंघटित कष्टकरी), मतीन भोसले (कार्यकर्ता पुरस्कार, सामाजिक प्रश्न), यांना गौरविण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र फाउंडेशनचे अंकुश कर्णिक, सुनील देशमुख उपस्थित होते.पालेकर म्हणाले, जवाहर विद्यापीठावर हल्ले सुरू झालेत, मराठी शिकवणाऱ्या शाळा बंद पडत आहेत. शिक्षण महाग होत आहे तर दुसरीकडे अनेकजण शिक्षणापासून वंचित राहत आहेत. सामाजिक परिवर्तन घडू पाहणाºया विचारवंतांच्या हत्या होतात व अद्याप त्याचा तपास लागत नाही. ही खेदाची बाब आहे. लेखकांना निर्भयपणे भरभरुन लिहिता येत नाही. साहित्यिकांना पोलीस संरक्षण दिले जात आहे. कार्यकर्त्यांना नक्षली ठरवून त्यांना तुरुंगात डांबले जात आहे. दहशत राखण्याकरिता अंधाराची गरज असते. म्हणूनच अंधार हे राजकीय अंधार असून ते पद्धतशीर आपल्यावर सातत्याने चालविले जात आहेत. सेन्सॉरशिपवरील दहशतीचा नवीन चेहरा आपल्याला ओळखू येत नाही. निर्भीड पत्रकारितेविरोधात कोट्यवधींचे दावे लावले जात आहेत. सामाजिक काम करणाºया संस्थांची नोंदणी करून त्यांचे अस्तित्व संपवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. विद्यार्थ्यांवर राष्ट्रद्रोहाचे खटले भरणे, माध्यमांवरील निर्बंध ही सर्व अंधारनीतीची हत्यारे आहेत. राजकीय व सांस्कृतिकवादाचा हा नवा अवतार असून सात्यत्याने ‘सांस्कृतिक संघर्ष’ सुरू ठेवला जात असल्याचे मत पालेकर यांनी व्यक्त केले.यावेळी महाराष्ट्र फाउंडेशनच्या संकेतस्थळाचे उद्घाटन पालेकर यांच्या हस्ते झाले. महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) पुरस्कार व साधना ट्रस्टचे समन्वयक विनोद शिरसाठ यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. हमीद दाभोलकर यांनी आभार मानले.केवळ आमट्यांचीच नव्हे तर सगळ्यांची पिढी काम करते...ज्या ठिकाणी बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांकरिता काम सुरू केले त्याजागी पूर्वी त्या कुष्ठरोग्यांची सेवा करण्यासाठी डॉक्टर्स नव्हते. बाबांनी हाती घेतलेले सेवेचे वत शेवटपर्यंत पाळले. त्या परिस्थितीवर मात करण्याकरिता आम्ही डॉक्टर्स झालो.आज कुटुंबात ९ डॉक्टर्स आहेत. समाजसेवेत रस घेण्याकरिता समाजाची मानसिकता बदलावी लागेल. आता हेमलकसा व आनंदवनात केवळ आमट्यांचीच नव्हे तर सर्वस्तरांतील व्यक्तींची पिढी काम करते, अशी भावना डॉ. विकास आमटे यांनी व्यक्त केली.
अंधार गडद करण्यासाठी डोळ्यांंवर पट्ट्या बांधताहेत- अमोल पालेकर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2019 3:27 AM