ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. २४ - मंत्रालयातील कर्मचा-यांना शहीद भगतसिंग आणि सुखदेव यांच्यातला फरक कळेनासा दिसू लागला आहे. शहीद दिनानिमित्त मंत्रालयात शहीद भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांच्या प्रतिमांच पूजन करण्यात आलं. यावेळी सुखदेव यांच्याऐवजी भगतसिंग यांचाच फोटो वापरण्यात आला. त्यामुळे फरक न कळलेल्या मंत्रालयातील कर्मचा-यांना भगतसिंग यांचे दोन फोटो लावले आहेत हे त्यांना उमगलंच नाही.
23 मार्चला भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरु यांना फाशी देण्यात आली होती. त्यांची पुण्यतिथी शहीद दिवस म्हणून साजरी केली जाते. शहीद दिनानिमित्त मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. यामध्ये भगतसिंग यांचे दोन फोटो ठेवण्यात आले होते. त्यातील एका फोटोखाली सुखदेव असं नावदेखील लिहिण्यात आलं होतं. सुखदेव यांच्याऐवजी भगतसिंग यांचा फोटो लावणे एक चूक आणि दुसरी चूक म्हणजे भगतसिंग यांचे दोन फोटो लावण्यात आले असतानादेखील ही चूक लक्षात आली नाही.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्रद्धांजली वाहण्यात आली मात्र त्यांनादेखील हा फरक लक्षात आला नाही. ही बाब मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी चौकशी करुन कारवाईचे आदेश दिले आहेत.