- चंद्रकांत कित्तुरे कोल्हापूर : बी हेवी मोलॅसिसपासून किंवा उसाच्या रसापासून थेट इथेनॉल निर्मिती करा आणि जादा साखर विका, असा आदेश केंद्राने साखर कारखान्यांना दिला आहे. देशातील साखरेचा साठा कमी करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहेत. आॅक्टोबरपासून सुरू होणाऱ्या नव्या साखर हंगामासाठी हा आदेश लागू होणार आहे.गरज २६० लाख टनांची असताना देशात चालू साखर हंगामात ३२० लाख टन साखरेचे उत्पादन झाले. यामुळे नव्या हंगामाच्या सुरुवातीला सुमारे १०० लाख टन साखर शिल्लक राहणार आहे. शिवाय नव्या हंगामात ३५० लाख टन साखर उत्पादित होईल, असा अंदाज आहे. यामुळे नव्या हंगामातही शिल्लक साखरेचा प्रश्न भेडसावणार आहे. यामुळे सरकारने इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन देण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्याचाच एक भाग म्हणून इथेनॉलचे दर १० ते २५ टक्क्यांनी वाढविले आहेत. सी हेवी मोलॅसिसपासून तयार होणाºया इथेनॉलला प्रतिलिटर ४३ रुपये ४६ पैसे, बी हेवीपासूनच्या इथेनॉलला ५२ रुपये ४३ पैसे, तर उसाच्या रसापासून थेट तयार होणाºया इथेनॉलला ५९ रुपये १३ पैसे असे दर निश्चित केले आहेत. या धोरणाचाच पुढचा भाग म्हणून बी हेवीपासून तसेच उसापासून थेट इथेनॉल निर्मिती केल्यास जेवढा ऊस इथेनॉल निर्मितीकडे वळविला जाईल आणि त्यापासून जेवढी साखर निर्मिती झाली असेल तेवढी साखर खुल्या बाजारात विक्रीला कारखान्याला परवानगी देण्यात आली आहे.असे असेल प्रमाणएक टन साखर निर्मिती म्हणजेच ६०० लिटर इथेनॉल असे प्रमाण केंद्र सरकारने निश्चित केले आहे. म्हणजेच १० टक्के उतारा गृहीत धरला तर प्रतिक्विंटल ६० किलो साखर विकता येऊ शकेल. केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या कोट्याव्यतिरिक्त खुल्या बाजारात विकता येणारी ही जादा साखर असणार आहे.शिल्लक साखरेचा साठा कमी करण्यासाठी केंद्र सरकारचा हा चांगला निर्णय आहे. देशाची जेवढी गरज आहे तेवढीच साखर निर्मिती करून उर्वरित ऊस इथेनॉल निर्मितीकडे वळविण्याचा भविष्यात हा कायमस्वरुपी पर्याय ठरु शकतो. - विजय औताडे, साखर उद्योगातील तज्ञ
इथेनॉलनिर्मिती करा, जादा साखर विका; साखर कारखान्यांना आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2018 12:25 AM