मुंबई : भारताची औद्योगिक शक्ती जगाला दाखिवण्यासाठी फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात ‘मेक इन इंडिया सप्ताह’ आयोजित करण्याचा मान महाराष्ट्राला मिळाला आहे. मुंबईमध्ये होणारा हा जागतिक औद्योगिक सप्ताह यशस्वी करण्यासाठी सर्वांनी ‘टीम महाराष्ट्र’ म्हणून काम करु या, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केले. या सप्ताहाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.‘मेक इन महाराष्ट्र’ सप्ताहाच्या लोगो अनावरणाचा कार्यक्रम सह्याद्री अतिथीगृहात झाला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले, भारतीय उद्योगशक्ती दाखिवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मेक इन इंडिया’चा नारा दिला आहे. तो यशस्वी करण्यासाठी प्रथमच पहिली जागतिक पातळीवरील औद्योगिक समिट मुंबईमध्ये आयोजित केली आहे. आपल्या राज्याला मिळालेला हा मान असून जागतिक स्तरावरील औद्योगिक जगताला देशासह महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी निमंत्रण देणारा हा सप्ताह आहे.जागतिकस्तरावर डावोस, व्हॅनोवर यांनी इकॉनॉमिक फोरम म्हणून नावलौकिक मिळविला आहे. त्याच धर्तीची जागतिक औद्योगिक परिषद मुंबई येथे आयोजित करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. गुंतवणुकीसाठी भारताकडे डेस्टिनेशन म्हणून पाहिले जात आहे. जगाला ही औद्योगिक शक्ती दाखविण्यासाठी १३ ते १८ फेब्रुवारी दरम्यान मेक इन इंडिया सप्ताह साजरा केला जाणार आहे. यासाठी आंतरराष्ट्रीय उद्योग समूह, काही देशांचे राष्ट्रप्रमुख, पंतप्रधान येणार असून या सर्वांच्या स्वागतासाठी महाराष्ट्र सज्ज झाला आहे.मुंबईमध्ये अशा प्रकारचा जागतिक स्तरावरील औद्योगिक सप्ताह प्रथमच साजरा करण्याचा मान मिळाला आहे. या संधीचे सोने करु या असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.(प्रतिनिधी)
‘मेक इन इंडिया’ सप्ताहाचा मान महाराष्ट्राला
By admin | Published: January 09, 2016 3:45 AM