आरोग्य विभागाच्या पेपर फुटीची न्यायालयीन चौकशी करा अन्यथा...; पडळकरांचा ठाकरे सरकारला थेट इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2021 01:42 PM2021-12-10T13:42:17+5:302021-12-10T13:43:54+5:30
Health Department Scam : पडळकर म्हणाले, होतकरू विद्यार्थ्यांचा, उमेदवारांचा गळा आवळणाऱ्या घोटाळ्याचे धागे-दोरे थेट मंत्रालयापर्यंत पोहचलेले आहेत आणि या पेपर फुटीच्या लिंक आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यापर्यंत पोहचल्या आहेत.
प्रशासनात आपल्याच मर्जीतले-ताटाखालचे अधिकारी बसवून त्याच्या मार्फत ब्लॅक लिस्टेट कंपन्यांना आरोग्य विभागाच्या पदभरती परीक्षांची कंत्राटे द्यायची, जेणेकरुन पदभरतीमध्ये वसूलीचा घोडे बाजार चालवण्याची आघाडी सरकारची परम्परा राखता आली पाहिजे. आरोग्यमंत्र्यांचे हे कारनामे आरोग्य विभागाच्या पदभरती घोटाळ्यामुळे आता पुराव्यानिशी सिद्ध झाले आहेत. हे सरकार आता अधिकृतरित्या वसूली सरकार म्हणून मान्यता प्राप्त झालेले आहे, असा गंभीर आरोप भाजप नेते गोपिचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी ठाकरे सरकारवर केला आहे. याच बरोबर, या घोटाळ्याच्या न्यायलयीन चौकशीची मागणीही त्यांनी केली.
पडळकर म्हणाले, होतकरू विद्यार्थ्यांचा, उमेदवारांचा गळा आवळणाऱ्या घोटाळ्याचे धागे-दोरे थेट मंत्रालयापर्यंत पोहचलेले आहेत. आणि या पेपर फुटीच्या लिंक आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यापर्यंत पोहचल्या आहेत. म्हणजे या सगळ्या घोटाळेबाजीला राज्य सरकारचेच अभय होते का? असा सवाल उपस्थित होत आहे.
होतकरू विद्यार्थ्यांचा, उमेदवारांचा गळा आवळणाऱ्या घोटाळ्याचे धागे-दोरे थेट मंत्रालयापर्यंत, पडळकर यांचा महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप...#gopichandpadalkar#Thackeraysarkar#healthdepartmentscam#Maharashtrapic.twitter.com/othNP7XHSK
— Lokmat (@lokmat) December 10, 2021
आरोग्य मंत्र्यांचा व घोटाळेबाजाचा संबंध नेमका काय आहे? हे जनतेला कळायला हवे. हे प्रकरण म्हणजे सगळी यंत्रणाच पोखरलेली आहे, या गंभीर घोटाळ्याची आरोग्य मंत्र्यांसहीत न्यायलयीन चौकशी झालीच पाहिजे राज्य सरकारने जर याबाबत टाळाटाळ केली तर आम्हीच हा घोटाळा सीबीआयकडे घेऊन जाऊ, असा इशाराही पडळकर यांनी ठाकरे सरकारला दिला आहे.