नागपूर : अयोध्येत भव्य राममंदिर बनले पाहिजे, ही कोट्यवधी भारतीयांची अपेक्षा आहे. त्यामुळे आयोध्येतील जमिनीच्या मालकी हक्काबाबत लवकरात लवकर निर्णय व्हावा आणि राम मंदिर उभारणीसाठी केंद्र सरकारने कायदा करावा, अशी अपेक्षा व्यक्त करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी पुन्हा एकवार हिंदुत्वाचा नारा दिला. रामजन्मभूमीचा वाद वाढण्यात राजकीय पक्षच जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला.
विजयादशमीनिमित्त रेशीमबाग मैदानावर रा. स्व. संघाचा शस्त्रपूजनाचा कार्यक्रम पार पडला. प्रमुख अतिथी म्हणून बालकांच्या अधिकारांसाठी कार्य करणारे नोबेल पुरस्कार विजेते कैलास सत्यार्थी उपस्थित होते. या वेळी पाथेय देताना भागवत म्हणाले, अयोध्येत पूर्वी मंदिर होते, याचे अनेक पुरावे उपलब्ध आहेत. मात्र जागेबाबतच्या न्यायिक प्रक्रियेत नवीन बाबी उपस्थित करून निर्णय न होऊ देण्याचा काही कपटी तत्त्वांचा प्रयत्न आहे.मात्र देशाच्या आत्मगौरवाच्या दृष्टीने अयोध्येत राममंदिर बनणे आवश्यक आहेच. राम मंदिर बनल्यानंतरच देशात सद्भावना व एकात्मतेचे वातावरण निश्चितच तयार तयार होईल, असा विश्वासही सरसंघचालकांनी व्यक्त केला.
प्रारंभी स्वयंसेवकांनी परिसरात संचलन केले आणि निरनिराळ्या शारीरिक कवायती सादर केल्या. त्या वेळी ते पाहण्यासाठी अनेक लोक उपस्थित होते. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, विदर्भ प्रांताचे संघचालक राम हरकरे, महानगर संघचालक राजेश लोया यांच्यासह हजारो स्वयंसेवक व नागरिक उपस्थित होते. पहिल्यांदाच या संपूर्ण कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण रा. स्व. संघाच्या संकेतस्थळावर करण्यात आले.
मतदानामध्ये ‘नोटा’ वापरले तर तोटा होऊ शकतो. त्यामुळे सद्य:स्थितीत जे पर्याय उपलब्ध आहेत, त्यापैकी सर्वोत्तम व राष्ट्रहिताला प्राधान्य देणाऱ्या पक्षाच्या उमेदवाराला मतदारांनी मत द्यावे, असे आवाहन भागवत यांनी केले. संपूर्ण देशात पसरलेले स्वयंसेवक राष्ट्रहिताच्या बाजूने आपली शक्ती उभी करतील, असे सूचक वक्तव्य करत त्यांनी संघाच्या सर्व स्वयंसेवकांना लोकसभा निवडणुकांसाठी सक्रिय होण्याचा संदेश दिला.
शबरीमालाच्या निर्णयावर नाराजीशबरीमाला देवस्थानासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर भागवत यांनी नाराजी व्यक्त केली. शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या धार्मिक परंपरा आणि कोट्यवधी भक्तांची श्रद्धा विचारात घेतली गेली नाही. न्यायालयाच्या निर्णयामुळे समाजात अशांतता, अस्थिरता निर्माण झाली आहे. सातत्याने हिंदू समाजावर विनासंकोच आघात का होत आहेत, असा प्रश्नही भागवत यांनी केला.
केंद्र सरकारला काढले चिमटेकेंद्र सरकारच्या कामाच्या गतीवरूनही सरसंघचालकांनी चिमटे काढले. स्वातंत्र्यानंतर कुठल्याच सरकारच्या कामाची गती वेगवान राहिली नाही. वर्तमान स्थितीत हेच चित्र आहे. सरकारच्या चांगल्या धोरणांवर प्रशासनाकडून तत्परता, संवेदनशीलता, पारदर्शकता दाखवत पावले उचलली गेली पाहिजेत. मात्र असे होत नसल्याचे ते म्हणाले.