ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ८ - आयफोनसह इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांमध्ये जागतिक स्तरावरील बडी कंपनी असलेल्या फॉक्सकॉनने येत्या पाच वर्षांमध्ये महाराष्ट्रात पाच अब्ज डॉलर्सची (सुमारे ३२ हजार कोटी रुपये) गुंतवणूक करण्याचा करार केला आहे. महाराष्ट्र सरकारने तैवानस्थित फॉक्सकॉनला या प्रकल्पासाठी दीड हजार एकर जमीन दिली आहे.
महाराष्ट्रातल्या प्रकल्पामध्ये संशोधन व विकास तसेच उत्पादन या दोन क्षेत्रांवर लक्ष केंद्रीत करण्यात येणार असल्याचे फॉक्सकॉनचे अध्यक्ष चोरी गोऊ यांनी सांगितले. महाराष्ट्र हे देशातील आर्थिक केंद्र आहे, तसेच कुशल मनुष्यबळ व सॉफ्टवेअर व हार्डवेअर या दोन्ही क्षेत्रांचा संगमही या राज्यात झालेला असल्यामुळे प्रकल्पासाठी महाराष्ट्राची निवड केल्याचे टेरी म्हणाले.
या संदर्भात महाराष्ट्र सरकारशी कंपनीचा सामंजस्य करार झाला असून टेरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तब्बल सात वेळा भेट घेतली. या प्रकल्पामुळे ५० हजारांना रोजगार मिळेल अशी अपेक्षा फडणवीसांनी व्यक्त केली आहे.