ठाणे: ठाण्यातील तीन हात नाक्याचे नामकरण ‘मराठा क्रांती चौक’ करावे, अशी मागणी ठाण्यातील मराठा क्रांती मूक मोर्चाच्या आयोजक कार्यकर्त्यांनी सोमवारी महापौर संजय मोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. ठाणे शहरात रविवार १६ आॅक्टोबर रोजी मराठा क्रांती मूक मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाची सुरुवात ठाण्यातील तीन हात नाका येथून झाली होती. मोर्चा यशस्वी झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी तीनहात नाका येथील चौकाचे या अगोदर कधीही नामकरण झाले नसल्याची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी ठाणे महापालिका प्रशासनाला पत्र देऊन या चौकाचे ‘मराठा क्र ांती चौक’, असे नामकरण करण्याची मागणी केली होती. त्याचे स्मरण महापौरांना करून देत त्यांनाही पत्र देऊन नामकरणाची मागणी केली. या मोर्चामुळे शासनाची, प्रशासनाची कोणतीही हानी झाली नाही. हा मोर्चा अभुतपूर्व होता. यापुढे असा मोर्चा निघेल की नाही हे सांगता येत नाही. या ऐतिहासिक मोर्चाची आठवण महाराष्ट्राला व ठाण्याच्या नागरिकांना सदैव रहावी याकरिता मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी ही मागणी केली आहे, असे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. महाराष्ट्रात जवळपास ३५ ठिकाणी हा मोर्चा निघाला. परंतु अशी मागणी अन्य कोणत्याही ठिकाणांहून झाली नाही. ठाण्यातूनच या मागणीची सुरूवात झाली असे मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. या नामकरणाचा प्रस्ताव येणाऱ्या महासभेत मंजूरीसाठी ठेवला जाईल, असे आश्वासन महापौरांनी दिले असल्याची माहिती त्यांनी दिली. (प्रतिनिधी)
‘मराठा क्रांती चौक’ करा!
By admin | Published: November 08, 2016 4:59 AM