२०१९ पासून महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेली राजकीय उलथापालथ थांबण्याचं नाव घेत नाही आहे. अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याने विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद रिक्त झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर काँग्रेस हा विधानसभेतील प्रमुख विरोधी पक्ष बनला आहे. यादरम्यान, पुणे जिल्ह्यातील भोर मतदारसंघातील काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहिले असून, विरोधी पक्षनेतेपदासाठी आपल्या नावाचा विचार करावा, अशी विनंती केली आहे.
सोमवारपासून महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे, त्या पार्श्वभूमीवर संग्राम थोपटे यांनी हे पत्र लिहिलं आहे. मात्र थोपटे यांनी हे पत्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना न लिहिता थेट काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांना पाठवलं आहे. सध्या महाराष्ट्र काँग्रेसकडे बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखे ज्येष्ठ नेते आहेत.
थोपटे यांनी खर्गे यांना लिहिलेल्या पत्रात लिहिले की, गेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये विधानसभा अध्यक्षपदासाठी माझ्या नावावर शिक्कामोर्तब झाले होते. मात्र तेव्हा अजित पवार यांनी त्याला विरोध केला होता. आता अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेससोबत नाही आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील राजकारण लक्षात घेऊन मी या संधीचा लाभ घेऊ शकतो. तसेच पुणे जिल्हा आणि पश्चिम महाराष्ट्रात कामगिरीमध्ये सुधारणा करण्यासाठी काँग्रेस पक्षाला प्रबळ विरोधी पक्ष म्हणून समोर आणू शकतो.
चार महिन्यांपूर्वी पुणे शहरातील कसबा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक झाली होती. तिथे मी मुख्य पर्यवेक्षक होतो. तसेच मतदारांसोबत संपर्क साधण्याचं काम मी केलं होतं. तसेच कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्येही मी पर्यवेक्षक होतो. थोपटे यांनी सांगितले की, जर काँग्रेसला भाजपा युतीविरोधात लढायचं असेल तर पश्चिम महाराष्ट्रातील प्रश्नांवर तोडगा काढावा लागेल. त्यासाठी आपला अनुभव महत्त्वपूर्ण ठरेल, असेही थोपटे यांनी सांगितले.