मुंबई : सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या व्यवस्थापकीय समिती बैठकीमध्ये (कमिटी मीटिंग) महिला सदस्यांना अयोग्य वागणूक दिली जात असल्याचा आरोप वूमन्स लीगल फोरम फॉर हाऊसिंग सोसायटीने केला आहे. या पार्श्वभूमीवर सोसायटीच्या कमिटी मीटिंगचे चित्रीकरण बंधनकारक करण्याच्या परिपत्रकाचे रूपांतर कायद्यात करण्याची मागणी फोरमने सहकारमंत्री आणि सहकार आयुक्तांकडे केली आहे. गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत फोरमच्या अध्यक्षा सुनीता गोडबोले यांनी ही माहिती दिली.गोडबोले म्हणाल्या की, २०१२ साली जारी करण्यात आलेल्या ९७व्या विधेयकानुसार, १०० किंवा त्याहून अधिक सदस्यसंख्या असलेल्या सर्व गृहसंकुलांच्या व्यवस्थापन समितीमध्ये किमान दोन महिला सदस्यांचा सहभाग असणे बंधनकारक आहे. महिलांसाठी राखीव असलेल्या या दोन जागा जरी रिक्त राहिल्या, तरीही पुरुष सदस्य त्या जागा भरून काढू शकत नाहीत. जेव्हा महिला सदस्यांबाबत किंवा इतर कोणत्याही प्रकारची समस्या किंवा तंटे उद्भवतात व व्यवस्थापन समिती हे तंटे सोडवण्यात अयशस्वी ठरते, तेव्हा वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) व विशेष सर्वसाधारण सभा (एसजीएम) यांचे चित्रीकरण मागवता येऊ शकते. त्यानंतर व्यवस्थापन समितीविरोधात किंवा आरोपी सदस्यांविरुद्धचे पुरावे म्हणून त्यांचा वापर करता येतो. १५ फेब्रुवारी २०१० रोजी सर्व गृहसंकुलांतील व्यवहार पारदर्शक करण्यासाठी एजीएम व एसजीएमचे चित्रीकरण करण्यासंदर्भात एक परिपत्रक आयुक्तांनी संमत केले आहे. मात्र, अद्याप या परिपत्रकाचा गांभीर्याने विचार केला जात नाही. म्हणूनच, सर्वसाधारण सभांचे चित्रीकरण करणे बंधनकारक करण्यासाठी या परिपत्रकाचा जीआर (विधेयक) आयुक्त आणि मंत्र्यांनी संमत करावा, अशी विनंती फोरमने केली आहे.बहुतेक सहकारी गृहसंकुलांच्या महिला सदस्यांसोबत फोरम सातत्याने संपर्कात आहे. त्या वेळी झालेल्या संवादांतून समितीच्या बैठकांत महिला सदस्यांना अयोग्य वागणूक मिळत असल्याची धक्कादायक बाब समोर आल्याचे डॉ. मोनाली चोपडे यांनी सांगितले. त्या म्हणाल्या की, राज्यात १ लाख १५ हजारांहून अधिक गृहसंकुले आहेत. मात्र त्यांमध्ये आपला अधिकार मिळवण्यासाठी पत्नी व मुली भांडत असल्याची ७००हून अधिक प्रकरणे फोरमसमोर आली आहेत. अनेक प्रकारांमध्ये व्यवस्थापकीय समित्या महिला सदस्यांना त्यांचे हक्क मिळवून देण्यात दिरंगाई करत असल्याचे किंवा मनाई करत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अधिकाधिक महिला या व्यवस्थापकीय समितीमध्ये सदस्य म्हणून कार्यरत असतील, यासाठी फोरमतर्फे जनजागृती केली जाईल. (प्रतिनिधी)>‘हाऊसिंग सोसायटी मॅनेजमेंट शो’गृहसंकुलांची देखरेख व व्यवस्थापन या विषयांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी देशातील पहिलावहिला ‘हाऊसिंग सोसायटी मॅनेजमेंट शो’ १० ते १२ मार्चदरम्यान वरळी येथील नेहरू सेंटर प्रदर्शन सभागृहात फोरमने आयोजित केलेला आहे. हा शो सर्वांसाठी मोफत असून महिलांनी मोठ्या संख्येने त्यात उपस्थित राहण्याचे आवाहन फोरमने केले आहे. आपापल्या गृहसंकुलांमधील कायदेशीर अडचणींना सामोरे जाणाऱ्या व हक्कांसाठी लढणाऱ्या महिला सदस्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तज्ज्ञांचा एक विशेष विभाग या शोमध्ये स्थापन करण्यात आल्याचे फोरमने स्पष्ट केले.
सोसायटीच्या सभेचे चित्रीकरण बंधनकारक करा!
By admin | Published: March 03, 2017 2:25 AM