मुंबई : मावळ विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाला मोठा झटका देत राष्ट्रवादीतून निवडून आलेले सुनील शेळके यांना नव्या सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान देण्याची मागणी करण्यात आली आहे.
शेळके भाजपकडून इच्छुक होते. त्यावरून विद्यमान आमदार बाळा भेगडे यांच्याशी त्यांचा संघर्ष सुरू होता. निवडणुकीपूर्वी दोघांच्या गटात मारामारी झाली होती. राष्ट्रवादीने जिल्ह्यातील बहुतेक जागांचे उमेदवार जाहीर केले होते पण मावळची उमेदवारी जाहीर केली नव्हती. भाजप नाराजीचा फायदा घेण्यासाठी हे केले होते. नंतर भाजपने भेगडे यांची उमेदवारी जाहीर केल्यावर शेळके यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आली होती. मावळ लोकसभा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला जात होता. बाळा भेगडे सतत दोन वेळा निवडून आले होते. त्यापूर्वी दोन निवडणुकांत दिगंबर भेगडे भाजपचे आमदार होते. असा पुणे जिल्ह्यातील मतदारसंघ शेळके यांनी राष्ट्रवादीकडे खेचून आणला आहे.
शेळके यांनी भेगडे यांचा जवळपास 94 हजार मतांनी पराभव केला होता. यामुळे शेळके यांचे समर्थक शरद पवार यांच्या भेटीसाठी मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी आलेले आहेत. शेळके यांना नव्या मंत्रीमंडळात स्थान मिळावे अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच शरद पवार आमचे ऐकतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. महत्वाचे म्हणजे अजित पवारांच्या बंडावेळी शेळकेही राजभवनावरील शपथविधीला उपस्थित होते. मात्र, शरद पवारांनी सुनावताच ते पुन्हा हॉटेलमध्ये परतले होते.