मुंबई : राज्यातील सर्व कारागृहांची स्थिती अत्यंत वाईट असल्याची दखल गांभीर्याने घेत हायकोर्टाने राज्यातील कारागृहाच्या अधीक्षकांना कैद्यांसाठी चांगले अन्न आणि स्वच्छ शौचालये, या मूलभूत सुविधा उपलब्ध करण्याचा आदेश गुरुवारी दिला.‘यासंदर्भात चार आठवड्यांत अहवाल सादर करावा,’ असे न्या. व्ही. एम. कानडे व न्या. शालिनी फणसाळकर-जोशी यांच्या खंडपीठाने म्हटले. तुरुंगाच्या वाईट अवस्थेबद्दल येरवडा कारागृहातील कैदी शेख इब्राहिम अब्दुल याने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. हा याचिकेवर खंडपीठाने पुण्याच्या न्यायालयीन अधिकाऱ्यांना येरवडा कारागृहाला भेट देण्याचे निर्देश दिले होते. अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या अहवालात येरवडा कारागृहाची स्थिती अत्यंत वाईट असल्याचे म्हटले आहे. या याचिकेची व्याप्ती वाढवत उच्च न्यायालयाने ही याचिका राज्यभरासाठीही लागू केली. मुंबईच्या आर्थर रोड कारागृहाची स्थिती न्यायालयीन अधिकाऱ्यांना पाहण्यास सांगितली. त्यांनी सादर केलेल्या अहवालानुसार, आर्थर रोडची क्षमता ८०४ असून या ठिकाणी २,४६६ आरोपी कोंबण्यात आले आहेत. त्याशिवाय शौचालये अस्वच्छ असून, त्यांची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. खंडपीठाने या शौचालयांची डागडुजी सहा महिन्यांत करण्याचे निर्देश देत सरकारला भायखळ्याच्या महिला कारागृहात बाथरूम आणि शौचालये बांधण्याचे निर्देश दिले. (प्रतिनिधी)
कैद्यांना स्वच्छ शौचालये उपलब्ध करा - हायकोर्ट
By admin | Published: March 04, 2016 3:21 AM