भुलेश्वर : ‘‘पुरंदर तालुक्यात दर वर्षीच पाऊस कमी पडतो. पडला तर पिकाला बाजारभाव मिळत नाही. यामुळे येथील शेतकऱ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. सुरुवातीला पुरंदर तालुक्यात विमानतळ व्हावे, यासाठी सर्वच तयार होते. मात्र, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे आरक्षण जाहीर झाले व मतांचे राजकारण करत येथील दलाल विमानतळाच्या विरोधात उभे राहिले. पुरंदरचा विकास साधायचा असेल, तर गावागावांत विमानतळ होण्याच्या दृष्टीने ठराव करण्यात यावे,’’ असे आवाहन जलसंधारण व जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केले.पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील मावडी व पिंपरी येथे जलपूजन व अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या वेळी आयोजित कार्यक्रमात शिवतारे बोलत होते.शिवतारे म्हणाले, की दलालांनी शेतकऱ्यांच्या जमिनी विकून त्यांना भकास केले आहे. केवळ मते मिळवण्यासाठी त्यांची डोकी फिरली आहे. विमानतळासंदर्भात चांगली भूमिका घ्या. विमानतळ झाल्यास शेतकऱ्यांना चांगले पॅकेज मिळणार आहे. जमिनीचा परतावा मिळणार असल्याने, त्या ठिकाणी कंपन्या उभारून त्यातही शेतकऱ्यांची भागीदारी राहणार आहे. याशिवाय शेतकऱ्यांच्या पाच हजार तरुणांना नोकऱ्या देण्यात येणार आहे. एम.आय.डी.सी मध्ये मोठ्याकंपन्या येतील. त्यातही तरुणांना नोकऱ्या मिळणार आहेत. यामुळे पुरंदर तालुका विकासाच्या दिशेने जाणार आहे. हे विमानतळ झाल्यास शेतकऱ्यांची शंभर पिढ्यांची प्रगती होणार असल्याचेही शिवतारे यांनी सांगितले. या वेळी पुरंदर तालुका शिवसेनेचे प्रमुख दिलीप यादव, अप्पासााहेब कोलते, गणेश मुळीक, माणिक निंबाळकर, धीरज जगताप, दिलीप देवकर, प्रल्हाद थेऊरकर, पांडुरंग देवकर, हरीश शेंडकर, संदीप गायकवाड, शहाजी गायकवाड, किरण साळुंखे, परिसरातील असंख्य ग्रामस्त महिला उपस्थित होत्या. या वेळी प्रल्हाद शेंडकर, रूपाली हंबीर, कलावती गायकवाड यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. (वार्ताहर)
गावागावांत विमानतळाच्या बाजूने ठराव करा
By admin | Published: October 19, 2016 1:36 AM