मुंबई : नोकरदार वर्गासाठी असलेल्या कररचनेत मागील अनेक वर्ष बदल झालेला नाही. यावेळी अर्थसंकल्पात नोकरदार वर्गासाठी १० लाख रुपयांपर्यंतचे वेतन करमुक्त करावे, अशी मागणी महाराष्ट्र राजपत्रित अधिकारी महासंघाने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे केली आहे.
या पत्रात महासंघाने कर रचनेत बदल करण्याचे सुचवले आहे. अधिकारी महासंघाने दिलेल्या प्रस्तावानुसार १० लाख रुपयांपर्यंतच्या वेतनावर कोणताही कर आकारला जाऊ नये, १० लाखांपासून १५ लाखांपर्यंत ५%, १५ लाखांपासून २० लाखांपर्यंत १०%, २० लाखांपासून २५ लाखांपर्यंत २०%, तर २५ लाखांपुढे ३०% कर असावा, अशी मागणी अधिकारी महासंघाने पत्रात केली आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी २ लाखांची अतिरिक्त सवलत देण्याची मागणीही पत्रात करण्यात आली आहे.
याशिवाय महासंघाने गृहकर्ज व्याज मर्यादा ३.५ लाख रुपयांपर्यंत वाढवण्याची आणि वैद्यकीय विमा प्रीमियमवरील सूट ७५ हजार रुपयांपर्यंत वाढवण्याचीही मागणी केली आहे. या सवलतींमुळे वेतनदार वर्गाला दिलासा मिळेल, असे महासंघाचे मत आहे.