सुप्रिया सुळेंना राष्ट्रीय अध्यक्ष करा! अरे मी देखील तयार होतो; अजित पवारांनी वयाचे कार्ड खेळलेच
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2023 03:06 PM2023-07-05T15:06:41+5:302023-07-05T15:08:15+5:30
Ajit Pawar vs Sharad Pawar उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज शरद पवारांचे वाभाडे काढले आहेत. आपली बाजू मांडताना अजित पवारांनी एक गोष्ट सोडली नाहीय.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज शरद पवारांचे वाभाडे काढले आहेत. आपली बाजू मांडताना अजित पवारांनी एक गोष्ट सोडली नाहीय. तसेच तुम्ही माझ्याविरोधात सभा घेतलात तर पुढच्या सात दिवसांत मलाही सभा घ्याव्या लागतील, असा इशारा अजित पवारांनी दिला आहे. तसेच शरद पवारांच्या राजीनाम्यावर भाष्य केले आहे.
चित्र स्पष्ट! शरद पवारांच्या बैठकीला कोण कोण आमदार, खासदार? अजितदादांच्या कोण? ही आहेत नावे
शरद पवारांनी मला सांगितलेले की मी उद्या पक्षाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देतोय. सुप्रिया सुळेंना राष्ट्रीय अध्यक्ष करा. मी त्यासाठी तयार होतो. पण दोन दिवसांत काय असे घडले की शरद पवारांनी अचानक निर्णय फिरवला आणि राजीनामा मागे घेतला. सरकारी अधिकारी ५८ व्या वर्षी निवृत्त होतो. भाजपात ७५ व्या वर्षी निवृत्त केले जाते. तुम्हीही आम्हाला आशिर्वाद द्यायला हवा होता, असे सांगत एकप्रकारे शरद पवारांनी निवृत्त व्हायला हवे होते, असे सूतोवाच अजित पवारांनी केले.
मी काही दिवसांनी सुप्रियासोबत बोललो. आपण एकाच घरात वाढलो, लहानाचे मोठे झालो. शरद पवारांना समजाव, असे तिला म्हणालो. परंतू तेव्हा सुप्रियाने ते हट्टी आहेत, ऐकणारे नाहीत असे मला सांगितले होते. साहेबांनी कुठेतरी थांबायला हवे होते. आपला राष्ट्रीय पक्ष आता राज्याचा झालाय. तो वाढविण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायला हवे होते. यासाठी नवीन नेतृत्वाला संधी देणे गरजेचे होते. भाजपला पाठिंबा द्यायचा निर्णय पवारांनीच घेतला होता. मग मला का खलनायक केले? मी कोणाच्या पोटी जन्माला आलो नाही हा माझा दोष आहे का? आज राज्यात ज्या चार पाच महत्वाच्या नेत्यांमध्ये माझे नाव शेवटचे तरी नाही का? आम्ही राज्याचे नेतृत्व करू शकत नाही का असा सवाल अजित पवारांनी केला.
जर आम्हाला भाजपासोबत जायचं नव्हते तर २०१४ मध्ये मंत्रिमंडळाच्या शपथविधीला का पाठवले. २०१७ रोजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आम्ही सगळे बंगल्यावर चर्चा झाली. वरिष्ठांना सांगितले सुधीर मुनगंटीवार, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, चंद्रकांत पाटील बैठकीत होते. कुठली खाती, पालकमंत्री पदे ठरली. निरोप आला, दिल्लीत बोलावले. वरिष्ठांसोबत बैठक झाली. २५ वर्षाचा आमचा मित्रपक्ष त्याला आम्ही सोडणार नाही असं भाजपाने सांगितले. शिवसेना-राष्ट्रवादी-भाजपा असे सरकार राहील असं भाजपाच्या वरिष्ठांनी सांगितले. तेव्हा शिवसेना नको, ती जातीयवादी आहे असं आमच्या वरिष्ठांनी सांगितले. त्यानंतर हे सर्व बारगळले असा गौप्यस्फोट अजित पवारांनी केला.