भार्इंदर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत सर्व झोपडपट्टीधारकांना मोफत घरे देण्याची घोषणा नुकतीच केली. त्याचे पडसाद मीरा-भार्इंदरमध्येही उमटले. शहराच्या विविध भागातील झोपड्यांचे पालिकेने काही वर्षापूर्वी राजीव आवास योजनेतंर्गत सर्र्वेक्षण केल्यानंतर नवीन योजनेच्या सर्वेक्षणाचे फॅड आले आहे. यामुळे सततच्या सर्वेक्षणाला कंटाळलेल्या झोपडपट्टीधारकांनी आता विकास हवा अशी मागणी केली आहे.शहरात सुमारे ५० हजार झोपड्या अस्तित्वात आहेत. त्यांना पालिकेने अद्याप मालमत्ता कराच्या कक्षेत आणले नसले तरी त्यांना पायाभूत सुविधा मात्र पुरविल्या जात आहेत. पालिकेने २००९ मध्ये जनतानगर झोपडपट्टी व काशिचर्च येथील अनुक्रमे ३ हजार ६६५ व ४७१ अशा एकूण ४ हजार १३६ झोपडीपट्टीधारकांचा बीएसयूपी योजनेत समावेश केला. या योजनेतंर्गत बांधण्यात येत असलेल्या इमारतींचे काम अद्याप पूर्ण झाले नसले तरी एका आठ मजली इमारतीतील सदनिका फेब्रुवारीमध्ये १७९ लाभार्थ्यांना वाटप करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले. या अतंर्गत लाभार्थ्यांनाही १० टक्के रक्कम द्यायची आहे. आठ वर्षापासून रखडलेली ही योजना पुरेशा निधीअभावी रेंगाळण्याची चिन्हे आहेत. त्यावर पालिकेने व्यापारी वापरासाठी २५ टक्के जमिनीचा विकास करुन ती भाडेतत्वावर किंवा विक्रीचा प्रस्ताव केंद्राच्या मान्यतेसाठी पाठविला आहे. यातून मिळणारा निधी त्या योजनेच्या पूर्णत्वासाठी खर्ची घातला जाणार आहे. दरम्यान, उर्वरित झोपडीधारकांना पक्की घरे बांधून देण्यासाठी पुर्वी राबविलेली राजीव आवास योजना काही महिन्यातच गुंडाळले. तत्पूर्वी पालिकेने १९९५ पूर्वीच्या झोपड्यांना फोटोपासचे वाटप केले आहे. सीआरझेडच्या नावाखाली घर दुरुस्ती ही नाकारली जाते आहे. अशातच राजीव आवास योजनेऐवजी केंद्राने प्रधानमंत्री आवास योजना सुरु केली आहे. (प्रतिनिधी)>कागदपत्रांसाठी झोपडीधारकांची धावपळ; नेत्यांची बॅनरबाजीनव्या योजनेच्या घोषणेचा पुरेपूर फायदा राजकीय मंडळींनी घेत झोपडपट्टी परिसरात बॅनरबाजी सुरु केली आहे. त्यात सर्वेक्षणासाठी आवश्यक त्या कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी नागरिकांमध्ये जनजागृतीसुद्धा सुरु आहे. राष्ट्रवादीने तर राजीव आवास योजनेतंर्गतच घरे मिळणार असल्याचा दावा केला असून भाजपाने मात्र केवळ प्रधानमंत्री आवास योजनेचा उदोउदो केला आहे. या नवीन सर्र्वेक्षणामुळे झोपडीधारक मात्र कागदपत्रे जमविण्यासाठी धावपळ करु लागला आहे.
सर्वेक्षण बस करा, आता विकास हवा!
By admin | Published: January 19, 2017 3:39 AM