सुप्रिया सुळेंना कार्याध्यक्ष करणे सहकाऱ्यांना मान्य नव्हते; शरद पवारांची कबुली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2023 06:40 AM2023-05-06T06:40:16+5:302023-05-06T06:41:03+5:30

अखेर शरद पवारांनी मागे घेतला पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा

Making Supriya Sule the working president was not acceptable to the colleagues- Sharad Pawar | सुप्रिया सुळेंना कार्याध्यक्ष करणे सहकाऱ्यांना मान्य नव्हते; शरद पवारांची कबुली

सुप्रिया सुळेंना कार्याध्यक्ष करणे सहकाऱ्यांना मान्य नव्हते; शरद पवारांची कबुली

googlenewsNext

मुंबई - राष्ट्रवादी पक्षात कार्याध्यक्ष नियुक्त केला जाणार, ही चर्चा शरद पवारांनी फेटाळली. मी राजीनामा दिल्यानंतर काही सहकाऱ्यांनी सुचवले की, तुम्ही अध्यक्षपदावर कायम राहा आणि सुप्रिया सुळे यांना कार्याध्यक्ष करा, पण ती सूचना सुप्रिया आणि इतर सहकाऱ्यांना मान्य नव्हती असं पवारांनी पत्रकार परिषदेत सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचा हट्ट तसेच देशभरातील समविचारी पक्षांच्या बड्या नेत्यांनी केलेल्या विनंतीनंतर शरद पवार यांनी आपला अध्यक्षपदाचा राजीनामा चौथ्या दिवशी मागे घेतला. भरगच्च पत्रकार परिषदेत त्यांनी राजीनामा मागे घेत असल्याचे जाहीर केले आणि बाहेर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. त्यापूर्वी, पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा, असा ठराव पक्षाच्या अध्यक्ष निवड समितीच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयातील बैठकीत शुक्रवारी सकाळी करण्यात आला आणि त्याची माहिती लगेच ‘सिल्व्हर ओक’वर जाऊन पवारांना देण्यात आली होती. 

पवार म्हणाले की, सार्वजनिक जीवनातील ६३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर मी सदर जबाबदारीतून मुक्त व्हावे, अशी माझी भूमिका होती. परंतु, या निर्णयाने जनमानसामध्ये तीव्र भावना उमटली. पक्षाचे असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी व माझे ‘सांगाती’ असलेल्या जनतेमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. मी निर्णयाचा फेरविचार करावा याकरिता हितचिंतक, माझ्यावर प्रेम आणि विश्वास असणारे कार्यकर्ते, असंख्य चाहते यांनी एकमुखाने, काहींनी प्रत्यक्ष भेटून मला आवाहन केले. त्याचबरोबर देशभरातून व विशेषतः महाराष्ट्रातून विविध पक्षांचे सहकारी व कार्यकर्ते यांनी मी अध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा घ्यावी, अशी आग्रही विनंती केली. त्यामुळे आपण राजीनामा मागे घेण्याचा निर्णय घेतला.

यापुढे पक्षवाढीसाठी तसेच पक्षाची विचारधारा व ध्येयधोरणे जनमानसांपर्यंत पोहोचविण्यासाठी मी अधिक जोमाने काम करेन, असा विश्वास त्यांनी दिला. तसेच, आपण सातत्याने दिलेली साथ हीच माझी खरी प्रेरणा आहे. आपण माझ्या ‘सांगाती’ राहिलात त्याबद्दल मी आपला कायमचा ऋणी राहीन, अशा शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानले.

पक्षात काहींना बढती मिळणार
काही ठिकाणी जिल्हा, राज्य पातळीवर १०-१५ वर्षे एकच व्यक्ती काम करत आहे. त्यांची इच्छा आहे वरच्या पदावर काम करण्याची संधी मिळावी. त्याची नोंद घ्यावी लागेल, त्याबाबतचा विचार पक्षाचे नेत्यांना विश्वासात घेऊन केला जाईल, असे सांगत पक्षातील काही लोकांना बढती मिळणार असल्याचे संकेत पवारांनी दिले.

मी पुन:श्च अध्यक्षपद स्वीकारत असलो, तरी संघटनेमध्ये कोणतेही पद अथवा जबाबदारी सांभाळणारे उत्तराधिकारी निर्माण होणे आवश्यक असते, असे माझे स्पष्ट मत आहे. त्यामुळे माझ्या पुढील कार्यकाळात पक्षामध्ये संघटनात्मक बदल करणे, नव्या जबाबदाऱ्या सोपविणे, नवीन नेतृत्व निर्माण करणे यावर भर असेल. - शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

अजित पवारांची अनुपस्थिती
पत्रकार परिषदेत प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह काही आमदार आणि इतर नेते उपस्थित होते. सुप्रिया सुळे सभागृहात नसल्या, तरी प्रतिष्ठानमध्येच होत्या. मात्र, अजित पवार अनुपस्थित होते. याबाबत छेडले असता, पत्रकार परिषदेत सगळेच असतात का, असा प्रतिसवाल पवारांनी विचारला.नेतृत्वाची सगळी फळी कधी पत्रकार परिषदेत बसत नाही. इतर नेते येथे कसे आहेत, याचेही मला आश्चर्य वाटते, असे पवार म्हणाले. तसेच, मी राजीनामा मागे घ्यावा हा ठराव माझ्याकडे पोहोचवण्याचे काम केले, त्या नेत्यांमध्ये अजित पवार होते. इथे कुणी आहे किंवा नाही त्याचा वेगळा अर्थ घेण्याची आवश्यकता नसल्याचेही ते म्हणाले.

त्यांना राजीनाम्याच्या निर्णयाची कल्पना होती
राजीनामा दिला, त्या दिवशी अजित पवार सोडून सर्व नेते राजीनामा मागे घेण्याची विनंती करत होते, असे विचारले असता पवार म्हणाले की, राजीनाम्याची कल्पना अजित पवारांना आधीच दिली होती, इतर नेत्यांनाही त्याची कल्पना नव्हती. त्यामुळे राजीनामा निर्णयाची माहिती अजित पवारांना आधीच होती, हे स्पष्ट झाले.

येणाऱ्या काळात अधिक जबाबदारी उचलावी
शरद पवार यांचे वय आणि प्रकृतीची काळजी घेऊन आपण सर्वांनी येणाऱ्या काळात अधिक जबाबदारी उचलावी. एकजुटीने आणि अधिक जोमाने काम करावे आणि पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक मजबूत करावा. शरद पवार यांनी घेतलेला निर्णय राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा उत्साह वाढवणारा असून, महाविकास आघाडी, देशातील विरोधी पक्षांच्या एकजुटीला बळ देणारा आहे- अजित पवार, विराेधी पक्षनेते, विधान सभा

Web Title: Making Supriya Sule the working president was not acceptable to the colleagues- Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.