'आमच्या पंतप्रधानांबद्दल बोलाल तर...', मालदीव वादावर शरद पवारांचा PM मोदींना पाठिंबा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2024 03:57 PM2024-01-09T15:57:43+5:302024-01-09T15:58:07+5:30
'माझी खासदारकी सध्याची टर्म संपल्यानंतर यापुढे निवडणूक लढवणार नाही. तोपर्यंत काम करत राहणार आहे.'
India vs Maldive: अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपचा दौरा केल्यानंतर मालदीवच्या तीन मंत्र्यांनी पंतप्रधान मोदींविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या वक्तव्याचे भारतात तीव्र प्रतिसाद उमटले आणि सोशल मीडियावरही बायकॉट मालदीव ट्रेंड करत आहे. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी या प्रकरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
शरद पवार म्हणाले की, 'नरेंद्र मोदी हे आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत. इतर देशातील कोणी आपल्या देशाच्या पंतप्रधानांविरोधात बोलत असेल, तर ते आम्ही खपवून घेणार नाही. आपल्या देशात त्यांच्याशी कितीही मतभेद असले तरी, इतर देशांतील लोक आपल्या पंतप्रधानांबद्दल बोलू शकत नाहीत,' अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली.
निवडणूक लढणार नाही
काही काळापासून अजित पवार सतत शरद पवारांना त्यांच्या वयाबद्दल टोमणे मारत होते. यावेळी पवारांनी खासदारकीबाबत मोठे वक्तव्य केले. 'माझी खासदारकी अडीच वर्षांनंतर संपत आहे, खासदारकीची सध्याची टर्म संपल्यानंतर मी निवडणूक लढवणार नाही. तोपर्यंत काम करत राहणार आहे. मला लोकांनी तिथे पाठवले आहे, तिथे काम करू नको का? 1967 पासून मी राजकारणात आहे. माझ्या विरोधकांनीही कधी वयावरून टीका केली नाही. अनेक संस्थांचा आजीवन अध्यक्ष आहे. तिथे मी काम करत राहणार आहे', असे शरद पवारांनी म्हटले आहे.
राम श्रद्धेचा विषय आहे
दरम्यान, अयोध्येतील राम मंदिराचा भव्य सोहळा आणि जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या विधानावर प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले की, 'राम श्रद्धेचा विषय आहे. पक्षांकडून रामाबाबत कोणतेही विधान करण्यात आलेले नाही. जितेंद्र आव्हाड यांचे वक्तव्य पक्षाचे विधान नाही. मुंबईचे पालकमंत्री शाळांमध्ये रामाबाबत स्पर्धा घेण्यासाठी सक्ती करत आहेत हे योग्य नाही. हा सेक्युलर देश आहे. गर्दीत रामाच्या दर्शनाला जाणार नाही, राज्यसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर जाईन,' असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.