लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : आदर्श पुरस्कारप्राप्त सहयोगी प्राध्यापक अनेक वर्षांपासून विद्यार्थी आणि प्राध्यापिकांचा लैंगिक छळ करीत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडित मुलींच्या बाजूने प्राध्यापिकेने आवाज उठवीत या प्राध्यापकाविरूद्ध स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचे धाडस दाखविल्याने हे प्रकरण उघडकीस आले. त्यानंतर प्राध्यापकाला अटक करण्यात आली. सध्या तो जामिनावर सुटला असला तरी संस्थेने कठोर कारवाईचा बडगा उगारत त्याला निलंबित केले आहे. अरूण शिंदे असे या प्राध्यापकाचे नाव आहे. महाराष्ट्रीय मंडळाच्या चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालयामध्ये हा प्रकार घडल्याचे उघडकीस आले आहे. शिंदे मुलांच्या वसतिगृहाचाही रेक्टर आहे. येता जाता मुलींवर अश्लील शेरेबाजी करणे, त्यांना घरी चहासाठी बोलावणे, वेशभूषेसह देहबोलीवरून वाईट बोलणे, गाणी गुणगुणणे, गिफ्टस देणे या त्याच्या कृत्यांनी मुलींसह ग्रंथालयातील महिलाही त्रासल्या होत्या. मात्र त्यांच्या हातात मार्क आहेत, या धास्तीपोटी अनेक वर्षांपासून मुली ही गोष्ट सहन करीत होत्या. सुरूवातीला बीपीएडचा अभ्यासक्रम हा एक वर्षांचा होता त्यामुळे मुली दुर्लक्ष करायच्या. अभ्यासक्रम दोन वर्षांचा झाला आणि मुलींच्या त्रासात अधिकच भर पडली. एके दिवशी सायबरच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची महाविद्यालयात कार्यशाळा झाली, त्यानंतर मुलींना हा लैगिंक छळाचा प्रकार असल्याचे समजले. सहनशीलतेचा अतिरेक झाल्यानंतर २००७ मध्ये त्यांची विद्यार्थीनी असलेल्या आणि नंतर सहकारी म्हणून काम करणाऱ्या महिला प्राध्यापिकेने विनयभंगाची तक्रार करण्याचे धाडस दाखविले. इतकी वर्षे हे प्रकार घडत असूनही संस्थाचालक अनभिज्ञ होते. गुरूवारी या प्राध्यापकाला अटक करण्यात आली. संस्थेने त्याला निलंबित केले.
आदर्श प्राध्यापकाकडून मुलींचा लैगिंक छळ
By admin | Published: May 09, 2017 2:02 AM