मुंबई : मालेगाव २००८ खटल्याची सुनावणी ‘इन-कॅमेरा’ व्हावी, यासाठी एनआयएने विशेष न्यायालयात अर्ज केला आहे. या अर्जाला प्रसारमाध्यमांनी विरोध करत, विशेष न्यायालयात मध्यस्थी अर्ज दाखल केला आहे.बॉम्बस्फोटाची सुनावणी ‘इन-कॅमेरा’ केली, तर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना खटल्यास उपस्थित राहता येणार नाही. न्यायाधीश, वकील, आरोपी आणि खटल्याशी संबंधित लोकांनाच केवळ या खटल्यास उपस्थित राहता येईल. हा खटला अतिशय संवेदनशील असून, काही साक्षीदारांची साक्ष गोपनीय ठेवणे आवश्यक आहे. मुस्लीमबहुल वस्ती असलेल्या परिसरात बॉम्बस्फोट झाला आहे आणि यासंबंधी काही आरोप आहेत व साक्षही आहे. त्यामुळे संबंधित साक्षीदारांच्या साक्षीविषयी वर्तमानपत्रात छापून आले, तर त्या परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हा खटला ‘इन-कॅमेरा’ चालविण्यात यावा, असे एनआयएने दाखल केलेल्या अर्जात म्हटले आहे.यावर प्रसारमाध्यमांनी मध्यस्थी अर्ज दाखल करत म्हटले आहे की, या संदर्भातील सुनावणी ‘इन-कॅमेरा’ केल्यास प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींच्या वृत्तांकन करण्याच्या अधिकारावर गदा आणण्यात येईल, तसेच महत्त्वाची माहिती लोकांपर्यंत पोहोचणार नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालण्यात येत आहे. न्या. विनोद पडळकर यांनी हा अर्ज दाखल करून घेत, एनआयएला या अर्जावर मंगळवारी उत्तर देण्याचे निर्देश दिले.
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: ‘इन-कॅमेरा’ सुनावणीला प्रसारमाध्यमांचा विरोध
By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2019 5:16 AM