Sanjay Raut: शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री दादा भुसे यांनी केलेल्या मानहानीच्या दाव्याप्रकरणी न्यायालयात उपस्थित न राहिल्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. संजय राऊत यांनी गिरणा कारखान्यात मंत्री दादा भुसे यांच्यावर १७८ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. यावरून दादा भुसे यांनी मालेगाव न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मालेगाव न्यायालयात खासदार संजय राऊत यांच्यावर दाखल केलेल्या मानहानी दाव्याची सुनावणी होती. परंतु या सुनावणीत संजय राऊत गैरहजर राहिले. परंतु मंत्री भुसे यांनी न्यायालयात हजर राहून साक्ष नोंदविली. संजय राऊत गैरहजर राहिल्यामुळे न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. संजय राऊत यांनी पुरावे सादर करावे, या शब्दांत न्यायालयाने वकिलामार्फत संजय राऊतांना सूचित केले आहे.
मालेगावच्या जनतेच्या आशिर्वादाने या भागाचे प्रतिनिधित्व करतो. या प्रकरणाची स्थानिकांना सर्व माहिती आहे. हे सगळे खोटे आहे, असा विश्वास मालेगावच्या नागरिकांना आहे. संजय राऊत यांनी मालेगावकरांची माफी मागायला हवी, असे आम्ही त्यांना पहिल्या नोटीसमध्ये सांगितले होते. या नोटिसीला काही उत्तर न दिल्यामुळे आता गुन्हा दाखल करावा, अशी मागणी न्यायालयाला केली आहे, अशी प्रतिक्रिया मंत्री दादा भुसे यांनी दिली.
दरम्यान, गिरणा सहकारी साखर कारखान्याबाबत संजय राऊत यांनी वृत्त प्रसिद्ध केले होते. दादा भुसे यांनी १७८ कोटी रुपयांचा शेअर्स घोटाळा केल्याचा आरोप केला होता. संजय राऊत यांनी माफी मागावी अन्यथा त्यांच्यावर बदनामी केल्याचा खटला दाखल करण्याचा इशारा दादा भुसे यांनी दिला होता. संजय राऊत यांनी माफी मागण्यास नकार दिला. त्यानंतर दादा भुसे यांनी मालेगाव अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला.