ऑनलाइन लोकमत
मालेगाव, दि. १५ - गुप्तधन शोधण्याकरिता संगणमन करुन आपल्या वडिलांचे ११ जुलैपासून अपहरण केले, अशी फिर्याद नागपूर येथील मानकापूर पोलिस स्टेशनला दिली. त्यावरुन आरोपीविरुध्द अंधश्रध्दा निमूर्लन २०१३ च्या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
मालेगाव तालुक्यातील पांगराबंदी येथील आकाश रतन खंडारे (वय २२) यांनी नागपूर येथील मानकापूर पो.स्टे.ला ताराचंद सिताराम पोहरे (४५) रा. आसोला ता.पातुर, इंदूबाई नामदेव अंभोरे (५०), राजु गोरले (३५) व गजानन नावाचा इसम सर्व रा.नागपूर यांचे विरोधात फिर्याद दिली. या फिर्यादीत असे नमुद करण्यात आले की, आकाशचे वडिल रतन सिदाजी खंडारे (४५) हे पायाळू असून त्यांचे आतेभाऊ ताराचंद पोहरे यांनी उपचारासाठी नागपूर येथे घेवून जातो असे सांगून ११ जुलै रोजी सर्वांच्या संमतीने घेवून गेले व त्यांनी वडीलांना नागपूर येथील इंदूभाऊ अंभोरे, राजु गोरले यांच्याकडे ठेवले. या चारही आरोपीने संगणमत करुन गजानन नामक इसमाच्या ताब्यात दिले. याबाबत वडिलांची विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली. आकाश याला समाधानकारक उत्तर न मिळाल्याने गुप्तधन शोधण्याकरिता अपहरण केले, अशी खात्री पटली. त्यावरुन आकाशने नागपूर जिल्हयातील मानकापूर पोलिस स्टेशनला कलम ३६४/३४ भांदवी सहकलम ३ नरबळी, महाराष्टÑ आणि इतर अमानुष अघोरी प्रथा जादु टोणा या प्रतिबंधक अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. याबाबत पोलिस अधिक्षक कार्यालय व मालेगाव पोलीस स्टेशनला आलेल्या माहितीवरुन गुरुवारी रात्री १२ च्या सुमारास हा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास ठाणेदार नाईकवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली संजय गवई करीत आहेत.