नाशिक : नाशिक वनवृत्तामधील उपविभाग असलेल्या मालेगावच्या वनक्षेत्रावर मागील सहा महिन्यांपासून खैर तस्करांच्या टोळ्या सक्रिय असून सुमारे चारशेहून अधिक खैरची झाडे कापून नेल्याचा धक्कादायक प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणला. यानंतर वनविभाग खडबडून जागे झाले असून नाशिकच्या दक्षता पथकामार्फत स्वतंत्र चौकशीचे आदेश मुख्य वनसंरक्षक एस.रामाराव यांनी दिले. या ‘रॅकेट’मध्ये सहभागी असणाऱ्या दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांविरूध्द कारवाईचे संकेत त्यांनी दिले आहे.मालेगाव उपवनविभागाच्या हद्दीमधील गाळणा, नागझरी-शितेवाडी वनक्षेत्रावर खैर तस्कर टोळीने मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केल्याचे सोमवारी (दि.१०) उघडकीस आल्याने संपूर्ण जिल्ह्यात संताप व्यक्त केला जात आहे. या गैरप्रकाराची नाशिक वनवृत्त विभागाचे मुख्य वनसंरक्षक एस.रामाराव यांनी गंभीर दखल घेतली आहे. सुमारे दोनशेपेक्षा अधिक खैरची लहान-मोठी झाडे कापल्याचे पंचनाम्यात समोर आले असून याबाबत अज्ञात गुन्हेगारांविरुध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तसेच या गैरप्रकारात उपवनविभागाच्या हद्दीमधील काही अधिकारी व कर्मचाºयांचा दुर्लक्षितपणा कारणीभूत आहे का? या दिशेनेही चौकशी सुरू करण्यात आली असून दोषी आढळून येणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यासह गुन्हेगारांवर येत्या दोन ते तीन दिवसांत कायदेशीर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे रामाराव यांनी स्पष्ट केले आहे. खैर तस्करांच्या टोळीचे हात थेट मालेगावच्या वनहद्दीपर्यंत येऊन पोहचल्याने धोका वाढला असून, वनविभागापुढे तस्करांच्या मुसक्या आवळण्याचे मोठे आव्हान असल्याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने मंगळवारी प्रसिध्द करताच वनविभाग खडबडून जागे झाले. नाशिक वनविभागाच्या मुख्य कार्यालयाने याबाबत गंभीर दखल घेऊन स्वतंत्र दक्षता पथकामार्फत चौकशी सुरू केली आहे. मालेगाव तालुक्यातील सॉ मिल’देखील संशयाच्या भोवऱ्यात असून या सॉ.मिलमध्ये खैरच्या बुंध्यांची साल काढून त्याचे लहान-लहान तुकडे करून वाहने रवाना केल्याची तालुक्यात चर्चा आहे. वनविभागाने त्या दिशेनेही तपासाची सुत्रे फिरविली आहे. मालेगाव उपवन विभागात मागील चार महिन्यांपासून सातत्याने खैराची तोड क रणारी टोळी सक्रिय आहे. त्यांना अटकाव करण्यास वनविभागाला अद्याप यश आलेले नाही.
गुजरातच्या ‘काथा’साठी महाराष्टच्या वनसंपदेला चूनागुजरात, दिल्लीमधील गुटखा व्यवसायासाठी खैराची मोठी मागणी असल्यामुळेमहाराष्टतील वनसंपदेवर वक्रदृष्टी तस्कारांनी केली आहे. महाराष्ट्र-गुजरातच्या सीमेला लागून असलेल्या जिल्ह्यातील सुरगाणा, पेठ तालुक्यातही खैर तस्करीचे साम्राज्य पसरले असून, हे साम्राज्य उद्ध्वस्त करण्यासाठी नाशिक पूर्व वनविभागाच्या अधिकाºयांकडून प्रयत्न सुरू असताना तस्करांचे हात थेट महरा-गुजरात सीमेवरून नाशिकच्या मालेगाव तालुक्यापर्यंत येऊन पोहचल्याने जंगलांची सुरक्षितता विशेषत: खैरची झाडे धोक्यात आली आहेत. गाळणा-चिंचवा या परिसरातील सुमारे तीस हजार हेक्टरवर पसरलेल्या जंगलातील खैरची लहान-मोठी झाडे ऊस कापावा अशी इलेक्ट्रीक कटरने जमिनीपासून कापून टाकत बुंधे लंपास केल्याचे दक्षता पथकाच्या पंचनाम्यात उघड झाले आहे.