सुयोग जोशी / ऑनलाइन लोकमत लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक, दि. 22 - उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत एकाही मुस्लिम उमेदवाराला तिकीट न देणाऱ्या भाजपाने मालेगाव महापालिकेत तब्बल 29 मुस्लिम उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवत मुस्लिम कार्डाचा केलेला देशभरातील पहिलाच प्रयोग कितपत यशस्वी ठरतो याकडे सर्वांच्याच नजरा खिळून आहेत.
मालेगाव महापालिकेसाठी उद्या मतदान होत असून सत्ता काबीज करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. शहराच्या पूर्व भागात कॉँग्रेस व राष्ट्रवादी- जनता दलमध्ये सरळ-सरळ सामना होत आहे तर पश्चिम भागात शिवसेना व भाजपाचे उमेदवार आमने-सामने उभे ठाकले आहेत. मनपाच्या २१ प्रभागातून ८४ नगरसेवक निवडून जाणार आहेत. कॉँग्रेसची एक जागा बिनविरोध झाल्यामुळे आता ८३ जागांसाठी मतदान होत आहे. निवडणूक रिंगणातील ३७३ पक्षिय उमेदवारांसमोर ९९ अपक्षांचे कडवे आव्हान आहे.
शहराच्या पूर्व भागात कॉँग्रेसला धोबीपछाड देण्यासाठी राष्ट्रवादी- जनता दलाने आघाडी केली आहे. कॉँग्रेसचे आमदार आसिफ शेख व माजी आमदार रशीद शेख यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. तर राष्ट्रवादीचे माजी आमदार मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल यांनी जनता दलाचे नगरसेवक बुलंद एकबाल यांना एकत्र घेऊन निवडणुकीला सामोरे जात आहेत. पश्चिम भागात ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्यासाठी निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. यापूर्वी पश्चिम भागाचे प्रतिनिधीत्व शिवसेनेच्या नगरसेवकांनीच केले आहे. यंदा प्रथमच भाजपाने पश्चिम भागातील प्रभागांमध्ये २० पेक्षाहून अधिक उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविले आहेत. भाजपाचा एकही उमेदवार यापूर्वी सभागृहात निवडून गेला नाही. त्यामुळे शिवसेनेला सत्ता टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान पेलावे लागणार आहे. या निवडणुकीसाठी जाहीर सभांकडे राजकीय पक्षांच्या स्टार प्रचारकांनी पाठ फिरविल्याने स्थानिक नेत्यांनाच प्रचाराची धुरा सांभाळावी लागली.
सोमवारी सायंकाळी ५.३० वाजा प्रचाराच्या तोफा थंडावणार असून मतदानाला आता अवघे काही तासच शिल्लक राहिल्यामुळे राजकीय नेत्यांची धावपळ सुरू झाली आहे.