संजय पाठक, नाशिक Malegaon Outer Vidhan Sabha 2004 News: मालेगाव बाह्य मा कोणाशे जोर... असा अस्सल अहिराणी प्रश्न केला की मतदारांची कळी खुलते आणि मग गावातील पारावर बसलेले ज्येष्ठ, पानटपरी- चहाटपरीवर असलेले बोलू लागतात. प्रमुख उमेदवार त्यांची कामे किंवा नाराजी... कधी फिरकले नाही इथंपासून ते कोणी निवडून आले तरी काय फरक पडणार असा थेट प्रश्न करतात. पण एक मात्र जाणवतं की, मालेगाव बाह्यमधील जनता जागरूक आहे आणि ती निकाल योग्यच लावेल, इतकी पक्की राजकारणात मुरलेली!
पालकमंत्री दादा भुसे यांच्या पाचव्यांदा लढतीमुळे लक्षवेधी ठरलेल्या मालेगाव बाह्य मतदारसंघात खरे तर सुरुवातीपासूनच उद्धवसेनेच्या अद्वय हिरे यांच्यात सरळ लढत होणार असल्याची अटकळ होती. मात्र, दादा भुसेंचेच समर्थक असलेल्या बंडू काका बच्छाव यांनी निवडणूक रिंगणात उतरून सरळ लढत तिरंगी करून टाकली.
मालेगाव बाह्य विधानसभा, तिरंगी लढतीत कोण-कोण?
वीस वर्षे आमदार असलेल्या दादा भुसे यांचे दहा वर्षे मंत्रिपद एका बाजूला तर शिवसेना दुभंगल्यानंतर दादा भुसे यांची भूमिका, त्यांचे पारंपरिक हिरे घराण्याचे प्रतिस्पर्धी, त्यातच त्यांच्याजवळील व्यक्तीने दिलेले आव्हान एका बाजूला अशा वातावरणात ही निवडणूक होत असल्याने तिरंगी लढतीत बाजी कोण मारणार असा प्रश्न आहे.
नाशिक जिल्ह्यातील पूर्वीचा दाभाडी मतदार संघ आता मालेगाव बाह्य म्हणून परिचय आहे. सुमारे १४० गावं असलेल्या या मतदारसंघात मालेगाव शहरालगतचा काही भाग आणि आणि माळमाथा परिसर देखील आहे. या मतदारसंघात गेल्या चार निवडणुकांमध्ये शिवसेनेचे वर्चस्व म्हणजेच भुसेंची दादागिरी दिसली आहे.
हिरेंच्य अपेक्षा उंचावल्या
शिवसेना दुभंगल्यानंतर भुसे शिंदेसेनेत गेले तर अद्वय हिरे यांना पक्षात घेतल्यानंतर यांनी उद्धव सेनेने चांगले आव्हान निर्माण केले अशी चर्चा सुरू झाली. त्यातच मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील यशानंतर हिरे यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. दरम्यान, दोघांचा पेटलेला संघर्ष, फौजदारी कारवाया यानंतर दोघांमध्ये टस्सल लढत होणार असे दिसते.
मात्र, याच दरम्यान, शिवसेनेकडे उमेदवारी मागण्यासाठी उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी गेलेल्या बंडूकाका बच्छाव यांनी उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी केल्याने दादा आणि हिरे या दोघांचीही तितकीच अडचण करून ठेवली आहे. अर्थात, असे असले तरी भुसे यांचे चार निवडणुकांमध्ये गावागावात असलेला संपर्क कमी नाही. त्यामुळे दादांना आव्हान देणे हे देखील सोपे नाही.
कारण राजकारण पालकमंत्री दादा भुसे यांच्या समवेत सतत राहणाऱ्या बंडूकाका बच्छाव यांनी बंडखोरी केली. त्यानंतर त्यांच्याबरोबर भाजपचे सुनील गायकवाड आणि अन्य काही पदाधिकारी फिरत असल्याचे सांगितले जाते. त्यावर आता सुनील गायकवाड यांच्यावर भाजपाने हकालपट्टीची कारवाई केली असली तरी दादा भुसे हे नाशिकचे पालकमंत्री आहेत. त्यामुळे आगामी काळात नाशिकचे पालकमंत्रिपद कोणाकडे यावरूनही मतदारसंघा- बाहेरील नेतेही विरोधी उमेदवारांना पाठबळ देत असल्याच्या चर्चा ऐकायला मिळतात.
मतदार काय म्हणतात...
निवडणूक खरे तर विकासाच्या मुद्द्यावर चर्चेत असते. त्यानुसार दादा भुसे यांनी प्रचारात छत्रपती शिवाजी महाराज शासकीय कृषी विज्ञान संकुल, अजंग-रावळगाव एमआयडीसी, नार पार गिरणा प्रकल्प, रस्ते, पीकविमा आणि लाडकी बहीण योजनेवर भर दिला आहे.
संशयास्पद कामे, विशिष्ट लोक जवळ बाळगणे अशा प्रकारच्या विरोधकांच्या तक्रारी आहेत. अर्थात, या सर्व मुद्द्यांवर चर्चा होत असली तरी अन्य मुद्देही मांडले जात आहेत. नवीन चेहरा हवा हा मुद्दा हिरे आणि बंडूकाका यांचे समर्थक गावकरी मांडतात. तर दुसरीकडे आता सुरू असलेल्या कामे पूर्ण करण्यासाठी दादा भुसेंची गरज लागेल असाही एक मुद्दा आहे.
संवदगाव, सायने, चंदनपुरी, चिखल ओहोळ या गावांत कानोसा घेतल्यानंतर ही मते ऐकू येतात अर्थात सवंद गावात तर मात्र बस शेड नाही, व्यायामशाळा अर्धवट बांधून पडून आहे, कोणीही निवडून आले तरी कामे करणार आहेत, का असा प्रश्न ग्रामस्थ करतात.
हे आहेत कळीचे मुद्दे
मालेगाव जिल्हा निर्मितीचे केवळ आश्वासनच होते आणि ते कागदावरच राहिले. एमआयडीसी वाढल्या, अजंग वडेल येथेही वसाहत झाली, मात्र अपेक्षित मोठा उद्योग आला नाही. नार पार योजना मंजूर झाली, परंतु ती • प्रत्यक्षात कधी येणार तसेच यासंदर्भात श्रेयवादाचा मुद्दा देखील प्रचारात आहे.
मालेगाव शहरातील या मतदार संघात स्थलांतरितांचा त्रास आणि वाढती गुन्हेगारी. मालेगाव बाह्य मतदारसंघात असलेला परंतु मनपाशी संबंधित उड्डाणपूल रखडलेला आहे.