मुंबई : मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी आजारपणाच्या कारणावरून दिशाभूल करून जामीन मिळविला असल्याने त्यांना निवडणूक लढविण्यास मज्जाव करून खटल्याच्या सुनावणीस रोज हजर राहण्याचा आदेश द्यावा, असा अर्ज मालेगाव दंगलीतील पिडीताने येथील ‘एनआयए’ विशेष कोर्टात केला आहे. यावर साध्वीने त्याला प्रसिद्धी हवी असल्याचा आरोप करत तसे उत्तर वकिलामार्फत न्यायालयाला दिले आहे.
उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करून घेताना प्रज्ञासिंहनी आपणास स्तनाचा कर्करोग असून, आधाराशिवाय आपल्याला उभेही राहता येत नाही, असे म्हटले होते. साध्वीलोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने त्यांनी दिशाभूल करून जामीन मिळविला, हेच स्पष्ट होते, असा आरोप करून निस्सार अहमद सैयद बिलाल यांनी एनआयएच्या न्यायालयात अर्ज केला होता. यामध्ये त्यांनी दिशाभूल करून जामीन मिळविला असल्याने त्यांना निवडणूक लढविण्यास मज्जाव करून खटल्याच्या सुनावणीस रोज हजर राहण्याचा आदेश द्यावा, असे म्हटले होते.
यावर साध्वी प्रज्ञासिंहने उत्तर दिले आहे. बिलालचा हा प्रसिद्धी मिळविण्यासाठीची खटाटोप असल्याचे यामध्ये म्हटले आहे. हा अर्ज बिनबुडाचा आणि राजकीय हेतूने प्रेरित आहे. याचिकाकर्त्याची याचिका दंडासहीत फेटाळण्यात यावी, अशी मागणीही तिने केली आहे.