मालेगाव कॅम्प (जि. नाशिक) : अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढू, असे आश्वासन देत नाशिक जिल्हा सहकारी बँकेत खातेदारांचे अडकलेले २ हजार कोटी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी (दि. १७) मालेगाव येथे झालेल्या जाहीर सभेत दिली.
पोलिस कवायत मैदानावर मालेगाव बाह्य मतदारसंघातील उमेदवाराच्या प्रचारार्थ सभेत एकनाथ शिंदे यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीतील कामगिरीचा आढावा घेतानाच मविआवर टीका केली.
यावेळी शिंदे यांनी सांगितले, ज्यांनी कोविड काळात मोठा भ्रष्टाचार केला ते घरात बसून राहिले व जनतेला वाऱ्यावर सोडून दिले. आता ते काँग्रेसच्या मांडीवर बसून सत्तेची स्वप्ने पाहत आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीचा उद्धवसेनेला विसर पडला आहे. त्यांच्या विचारांना तिलांजली देत त्यांनी काँग्रेसचा हात पकडण्यात आला, अशी टीका करत शिंदे यांनी महायुती सरकारने राबविलेल्या विविध योजनांचाही आढावा घेतला. मालेगावच्या सभेनंतर नांदगाव येथेही शिंदे यांची सभा झाली.
उलाढालप्रकरणी करेक्ट कार्यक्रम करू
एकनाथ शिंदे यांनी मालेगाव येथील नामको बँकेच्या शाखेत झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या संशयास्पद आर्थिक उलाढालीवरही भाष्य केले. शिंदे म्हणाले, की या संशयास्पद आर्थिक उलाढालीच्या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येईल. या प्रकरणी लवकरच करेक्ट कार्यक्रम करू. यामध्ये दोषी आढळलेल्यांना साेडले जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
पहिल्या क्रमांकावरील मतदारसंघ विकासात शेवटी
नंदुरबार : अक्कलकुवा हा राज्यातील पहिल्या क्रमांकाचा मतदारसंघ असताना विकासात राज्यात सर्वांत शेवटी आहे. या मतदारसंघाच्या विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत. जिल्ह्याचा आणि मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करावयाचा असल्याने पुन्हा महायुतीचे सरकार सत्तेवर आणा, असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी रविवारी धडगाव येथील जाहीर सभेत केले. शिंदे म्हणाले, अडीच वर्षांत राज्याच्या विकासाच्या उद्देशाने विविध निर्णय घेतले. देशात सर्वाधिक गुंतवणूक असलेले राज्य म्हणून नावारूपास आणले. लाडक्या बहिणी, लाडके भाऊ योजना सुरू केल्या.
लोक कामाची पावती देतील याची आम्हाला खात्री
पिंपळनेर (जि. धुळे) : दोन वर्षांत राज्याच्या हिताचे अनेक निर्णय महायुती सरकारे घेतले आहेत. लोक या कामांची पोच पावती देतील, याची खात्री असून राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येणार आहे. साक्री मतदारसंघात विकास निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही एकनाथ शिंदे यांनी दहिवेल येथील सभेत दिली.