लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : माळीण गाव पुनर्वसनाचे आदर्श मॉडेल असून राज्यातील इतर गावांचेही याच धर्तीवर पुनर्वसन करण्यात येईल, अशी घोषणा करणाऱ्या फडणवीस सरकारचा भ्रष्ट आणि निष्काळजी कारभार पहिल्या पावसानेच उघडा पाडला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दोन महिन्यांपूर्वी लोकार्पण करण्यात आलेल्या पुर्नवसित माळीण गावाची पहिल्याच पावसात वाताहात झाली आहे. त्यामुळे हे सरकार केवळ बोलघेवडे आणि असंवेदनशील असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे, अशी टीका प्रदेश काँग्रेस सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. पुणे जिल्ह्यातील माळीण गाव २०१४ साली अतिवृष्टीमुळे अक्षरश: गाडले गेले होते. या दुर्घटनेत १५१ लोकांचा मृत्यू झाल्यानंतर राज्य सरकारने कोट्यवधींचा खर्च करुन गावाचे पुनर्वसन केले. २ एप्रिल रोजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पुनर्वसित गावाचा लोकार्पण सोहळाही पार पडला. यावेळी पुनर्वसित माळीण स्मार्ट ग्राव असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला होता. त्यांचा हा दावा पोकळ असल्याचे पावसाने सिद्ध केले आहे. पावसामुळे माळीण गावातील घरांच्या भिंती, पायऱ्या, ड्रेनेज पाइप्स, शाळा, मंदिर आदींना तडे गेले आहेत. काही ठिकाणी रस्ते, भिंती, पायऱ्या खचल्या आहेत. रस्त्यांचे भराव वाहून गेल्याने मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे ग्रामस्थांच्या मनात पुन्हा भितीचे वातावरण आहे. काम निकृष्ठ दर्जाचे आहे. या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला. पारदर्शकतेच्या गप्पा मारणाऱ्या फडणवीस सरकारचे पायही मातीचेच आहेत, हे यातून सिद्ध झाल्याचा आरोप सावंत यांनी केला.
‘माळीण’ गाव भ्रष्टाचाराचे पारदर्शक उदाहरण - काँग्रेस
By admin | Published: June 29, 2017 1:21 AM