मुंबई : दोन खात्यांच्या वादात दुर्घटनाग्रस्त माळीण गावाचे पुनर्वसन अडले असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच राज्य सरकार खडबडून जागे झाले. मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून त्या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना तत्काळ ५ कोटी ५५ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी जारी केली. तसेच माळीण गावाचे पुनर्वसन आता मदत व पुनर्वसन विभागामार्फत निर्णयदेखील घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ५.५५ कोटी रुपयांचे अर्थसहाय्य पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे आजच सुपूर्द करण्यात आले. या रकमेसह आतापर्यंत मृतांच्या वारसांना ७ कोटी ५५ लाख रुपये देण्यात आले आहे. या दुर्घटनेत १५१ जण मृत्युमुखी पडले होते. मृत व्यक्तीच्या वारसास प्रत्येकी पाच लाख रुपये अर्थसहाय्य देण्याचे शासनाने जाहीर केले होते. १ आॅगस्ट २०१४ रोजी २ कोटी रुपये उपलब्ध करुन देण्यात आले होते. त्यानंतर मदत देण्यात आलेली नव्हती. उर्वरित अर्थसहाय्य आज देण्यात आले. पुनर्वसनाचे काम आदिवासी विकास विभागाऐवजी आता मदत व पुनर्वसन विभागातर्फे करण्यात येईल, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. (विशेष प्रतिनिधी)आदिवासी विकास आणि मदत व पुनर्वसन या दोन विभागांच्या वादात माळीणचे पुनर्वसन रखडले, असे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध करताच मुख्यमंत्री फडणवीस यांनी यासंदर्भात तत्काळ निर्णय घेऊन मदतीचा प्रश्न मार्गी लावला.
अखेर माळीणला मिळाले साडेपाच कोटी!
By admin | Published: January 09, 2015 2:22 AM