घोडेगाव : माळीण दुर्घटनेत बेघर झालेल्या कुटुंबाना रविवारी अखेर हक्काची घरे मिळाली. शासनाने या सर्वांना ताबे पावती करून दिल्यानंतर माळीणवासीयांनी पत्र्याच्या शेडमधून पक्कया घरात आपला संसार हलविला. यावेळी अनेक लोक भावूक झाले होते.३० जुलै २०१४ रोजी माळीण गावावर दरड कोसळून संपूर्ण गाव गाडले गेले. यामध्ये ४४ कुटुंबातील १५१ लोक मृत्युमूखी पडले. या दुर्घटनेमुळे माळीण ग्रामस्थ बेघर झाली. दुर्घटनेच्या वेळी ग्रामस्थांचे कायमस्वरूपी पुनर्वसन केले जाईल असे शासनाने जाहिर केले. तोपर्यंत रहाण्यासाठी माळीण फाटयावर भालचीम शाळेच्या पटांगणात पत्राची शेड बांधून देण्यात आली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर मान्यवरांच्या हस्ते पक्कया घराच्या चाव्या देण्यात आल्या. नवीन उभारलेले गाव व बांधण्यात आलेली घरे पाहुण माळीणकर भारावून गेले होते. तसेच या कार्यक्रमासाठी राज्य मंत्रीमंडळातील आलेले अनेक मंत्री, मान्यवर, प्रशासनातील अधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे लोक पाहून ते अधिकच भावूक झाले.
माळीणकर झाले भावुक
By admin | Published: April 03, 2017 1:14 AM