मुंबई - बदलापूर बलात्कार प्रकरणानंतर विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं. त्यातच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या नावानं कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. त्यात ते एका पीडितेला तिला मरायचं असेल तर मरू दे, तू मध्ये पडू नकोस असं ते एका कार्यकर्त्याला सांगताना दिसतात. ती क्लिप सोशल मीडियात फिरत असताना मनसे नेते संदीप देशपांडे यांनी त्यांच्या ट्विटवरून ऑडिओ पोस्ट करत आव्हाडांवर टीका केली. त्यावरून जितेंद्र आव्हाडांनी राज ठाकरे माझा आवाज काढू शकतात असा आरोप केला होता. मात्र आता त्या ऑडिओ क्लिपमधील मल्लिकार्जुन पुजारी या व्यक्तीने समोर येऊन झालेली घटना सांगत चौकशीची मागणी केली आहे.
मल्लिकार्जुन पुजारी म्हणाले की, २ वर्षाआधी एक घटना घडली होती. एक पीडित महिला माझ्याकडे आली आणि मला न्याय मिळवून देण्यासाठी मदतीची विनंती केली. बलाढ्य, पैसेवाल्या माणसाने माझा शारिरीक छळ केला असून मला कुणी मदत करत नाही तुम्ही मदत करा असं मला बोलली. त्यानंतर मी संबंधित महिलेचं ऐकून घेतले. त्यांच्याकडील पुरावे बघितले. त्यानंतर अंधेरीतल्या डी.एन नगर पोलीस ठाण्यात एका बड्या मुझ्यिक कंपनीच्या मालकावर ३७६ अंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांना सर्व घटना सांगून आरोपीला अटक करण्याची मागणी केली होती असं त्यांनी माहिती दिली.
पण त्यावेळेस तत्कालीन महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पूर्ण ताकदीने आरोपीला वाचवण्यासाठी, त्यांची राजकीय शक्ती पणाला लावून आरोपीला वाचवले. त्यानंतर पीडित महिलेला आरोपीसमोर नतमस्तक होण्यास आव्हाडांनी भाग पाडले. हेच आव्हाड बदलापूरात जाऊन, पुण्यात जाऊन काय बोलतोय, वाह रे आव्हाड. संदीप देशपांडे यांनी हे प्रकरण पुन्हा बाहेर काढले तेव्हा त्याला उत्तर देताना आव्हाड म्हणाले, कोण तो ब्लॅकमेलर होता. ब्लॅकमेलिंग करत होता असा आरोप करतात. परंतु हे प्रकरण २ वर्षापूर्वीचे आहे. आमच्यावर ब्लॅकमेलिंगचे आरोप करायला आम्ही रस्त्यावर पडलोय काय? या प्रकरणाची गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एसआयटी चौकशी करावी. जर मी पैसे घेतले असतील तर ते बाहेर पडेल अन्यथा ज्या बलाढ्य आरोपीला वाचवण्यासाठी आव्हाडांनी तडजोड केली. आर्थिक देवाणघेवाण केली तेही बाहेर पडेल अशी मागणी मल्लिकार्जुन पुजारी यांनी केली आहे. टीव्ही ९ मराठीने ही मुलाखत प्रसारित केली.
दरम्यान, बदलापूर प्रकरणी आरोपीला अटक झाली, परंतु तुमचं सरकार असताना त्या आरोपीला अटक का केली नाही? याचे उत्तर महिलांना द्या. आज राष्ट्रवादीवाले शपथा खातायेत परंतु तेव्हा तुमची आपुलकी कुठे गेली होती. माझ्यावर ब्लॅकमेलिंगचे आरोप करायचे असेल तर ते सिद्ध करून दाखव. आरोपीची, तुझी आणि माझीही नार्को टेस्ट करावी. सगळं समोर येऊ दे. एका मुलीला मदत करण्यासाठी माझ्या कुटुंबाला आणि मला किती त्रास झालाय हे आम्हाला माहिती आहे. संदीप देशपांडेंना मी धन्यवाद देतो, हे प्रकरण पुन्हा बाहेर काढले. या प्रकरणाची एसआयटी चौकशी झाली पाहिजे अशी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी करतो असं मल्लिकार्जुन पुजारी यांनी सांगितले.