मल्लिकार्जुन खर्गेंचे मानसिक संतुलन ढळले, त्यांनी मर्यादा ओलांडल्या; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2023 09:15 PM2023-04-27T21:15:54+5:302023-04-27T21:41:13+5:30
'मौत का सौदागर'पासून सुरू झालेला काँग्रेस नेत्यांचा पोटशूळ आज 'जहरीला साप 'इथंपर्यंत पोचला.
मुंबई: काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आज जहरी टीका केली. त्यांनी मोदींना विषारी साप म्हटले. यानंतर भाजप नेत्यांनी काँग्रेसवर टीका करण्यास सुरुवात केली. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीदेखील काँग्रेस आणि खर्गेंवर जोरदार हल्लाबोल केला. खर्गेंचे मानसिक संतुलन ढळले आहे, म्हणूनच ते विश्वप्रिय नेते पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्याबद्दल वारंवार वाईट बोलतात, अशी टीका त्यांनी केली.
ते पुढे म्हणाले, कर्नाटक निवडणुकीत खर्गेंनी सभ्यतेच्या मर्यादा ओलांडल्या. गांधी परिवाराला मोदीजींबद्दल आकस आहेच. 'मौत का सौदागर'पासून सुरु झालेला काँग्रेस नेत्यांचा पोटशूळ आज 'जहरीला साप 'इथंपर्यंत पोचला. यांना कधीच चांगले शब्द सापडत नाहीत. बोलताही येत नाहीत. त्यांच्या शब्दकोशातच नाहीत. त्यांची सत्ता गेली, राज्ये गेली, मतदार गेले, समर्थक गेले, नेते गेले, खासदारकी गेली, घर गेले पण डोक्यातली विकृत विचारांची मस्ती जात नाही.
शिव्या पडतात, वाईट बोलले जाते म्हणजे मोदीजींच्या वादळात काँग्रेसचा केरकचरा उडून जाण्याची वेळ नक्की झाली हाच याचा अर्थ ! मोदींची लाट काँग्रेसचे कान, नाक आणि डोके बधिर करत आहे. खर्गेजी लक्षात घ्या, आम्ही जनतेच्या भल्यासाठी भारताच्या 'अमृतकाळाचे ' भान ठेवतो. तुम्ही अमृतकाळात "विषाची" आठवण ठेवता. तुमची संस्कृती विष पेरण्याची, समाजाला विभाजीत करण्याची आहे. म्हणूनच तुम्हाला विष आठवते.
तुम्हाला कर्नाटकी जनता माफ करणार नाही, असंही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.