अनिरुद्ध पाटील/ लोकमत न्यूज नेटवर्कबोर्डी : डहाणू तालुक्यात अल्पवयिन मातांचे प्रमाण वाढते असून आगामी काळात त्यामुळे कुपोषणाचा प्रश्न गंभीर बनू शकतो. बालविवाह आणि लिव्हइन रिल्सेशनशीपमुळे हा आकडा वाढता आहे. दरम्यान, बालविवाह रोखण्यात शासनाच्या योजना व कार्यक्रम हतबल ठरत आहेत. या बाबत जनजागृतीसह ठोस उपाययोजना अमलात आणण्याची गरज अधोरेखित होत आहे. मुंबईपासून १५० किमी अंतरावर महाराष्ट्र गुजरात सीमेलगत डहाणू हा आदिवासी बहुल तालूका आहे. स्वातंत्र्य प्राप्तीचा सात दशकाचा दीर्घ कालावधी उलटल्यानंतरही तालुक्यात बाल मातांचे प्रमाण कमी झालेले नाही. आदिवासींच्या विकासाकरिता नवनिर्वाचित पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली. तरी सुद्धा परिस्थिती न बदलल्याने या जिल्हयाकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याची बाब स्पष्ट झाली आहे. या तालुक्यात आजही बालविवाह होत आहेत. शिवाय शासनाने ठरवून दिलेली विवाह करण्याची वयोमर्यादा ओलांडण्या आधीच लिव्हइन रिलेशनशिपमध्ये राहण्याच्या पद्धतीला येथील काही समाजाने स्वीकारलेले आहे. त्याचा परिणाम बाल मातांचे प्रमाण वाढण्यात झाला आहे. तालुक्यात सर्रास बालविवाह उरकले जात असताना ते रोखण्यात शासकीय यंत्रणा कुचकामी ठरली आहे. परिणामी कमी वजनाच्या बालकांची संख्या वाढून आगामी काळात कुपोषणाचा प्रश्न अधिकच गंभीर शकतो. बालमृत्यू व कुपोषण रोखण्याच्या उपाययोजना राबविण्यासाठी कोट्यवधी रूपये खर्च केले जातात. मात्र, नेमक्या प्रश्नाला हात घातला जात नाही. या करिता अभ्यासगटाची नियुक्ती होणे क्र मप्राप्त असून स्थानिक लोकप्रतिनिधी व संस्थांचा त्या मध्ये समावेश केला पाहिजे. सामूहिक विवाह सोहळे आयोजित करून बालविवाहा सारख्या समस्यांना आळा घातला जाऊ शकतो. प्रसुतीचे वय ‘सरासरी २०’घोलवड, चिंचणी, चंद्रनगर, आशागड, ऐना, गंजाड, तवा, धुंदलवाडी, सायवण आदि नऊ प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. या केंद्रातील प्रसूतीच्या अधिकृत आकडेवारीनुसार बालमातांची माहिती हाती आली आहे. त्या पैकी २०१५-१६ या वर्षात घोलवड १, सायवन ६, चिंचणी ३, चंद्रनगर १६, धुंदलवाडी आणि गंजाड प्रत्येकी ८ बालमातांची नोंद झाली आहे. काही ठिकाणी प्रसूतीचे वय लिहताना ‘सरासरी २० वर्षे’ असे लिहण्यात आल्याने हा प्रकार विचार करण्यास भाग पाडतो. दरम्यान संबंधित आरोग्य केंद्रांकडून आरोग्य विभागामार्फत ही माहिती प्राप्त झाली असून त्यामध्ये अन्य ३ केंद्रातील माहिती अद्याप हाती आलेली नाही. त्यामुळे हा आकडावाढू शकतो.
बालविवाहामुळे कुपोषण
By admin | Published: July 06, 2017 5:51 AM