रवींद्र साळवे/ऑनलाइन लोकमतमोखाडा, दि. 27 - कुपोषण आणि बालमृत्यूच्या घटना अत्यंत दुर्दैवी असून त्यासाठी युद्धपातळीवर प्राधान्यक्रमाने काम करावे लागेल, असे मत महाराष्ट्राचे राज्यपाल विद्यासागर राव यांनी आज व्यक्त केले. श्रमजीवी संघटना आणि समर्थन संस्थेच्या शिष्टमंडळासोबत आज ( ता. २७) राजभवनावर झालेल्या बैठकीत ते बोलत होते. सरकार सोबत संस्था- संघटनांनीही या मोहिमेत सहभागी व्हायला हवे, असेही ते म्हणाले. कुपोषण आणि दारिद्र्य निर्मूलनासाठी संघटना सरकारला आवश्यक ते सर्व सहकार्य करेल, असे आश्वासन विवेक पंडित यांनी यावेळी राज्यपालांना दिले. पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होत असलेले बालमृत्यू आणि कुपोषणाच्या प्रश्नावर गेले अनेक दिवस श्रमजीवी संघटना सातत्याने आंदोलन करत आहे. सोबतच कुपोषण निर्मूलनाची मोहीम राबवून स्वयंसेवी तज्ञ डॉक्टरांच्या मदतीने आरोग्य शिबिर देखील घेतले जात आहे. कुपोषणाचे प्रमाण लक्षणीय असतानाही सरकार यासाठी ठोस उपाययोजना करत नसल्याने श्रमजीवी संघटनेने या प्रश्नावर रान उठवले होते.
दरम्यान विवेक पंडित यांनी राज्यपालांचे लक्ष या प्रश्नावर वेधले होते. याच पार्श्वभूमीवर आज राजभवनात राज्यपाल विद्यासागर राव यांच्या सोबत श्रमजीवी संघटनेचे शिष्टमंडळ आणि राज्यपालांचे सचिव अशी बैठक पार पाडली. सुमारे एक तास चाललेल्या बैठकीत खूप सकारात्मक चर्चा झाली. कुपोषण हे गंभीर संकट असून त्या विरोधात युद्धपातळीवर लढायला हवे असे मत व्यक्त करत तुम्ही याबाबत सक्षम उपाय सुचवावा असेहि राज्यपालांनी शिष्टमंडळाला सांगितले. विवेक पंडित यांनी कुपोषणाचा संबंध रोजगार आणि दरिद्र्याशी असल्याचे स्पष्ट करत यावर तत्कालीन आणि दीर्घकालीन उपाययोजना काय आणि कशा असाव्यात याचा संपूर्ण तपशील राज्यपालांसमोर मांडला. राज्यभरातील प्रशासकीय अनुशेष आणि पालघर या नवनिर्मित जिल्ह्याच्या रिक्त पदं, समस्या आणि सरकारी अनास्थेबाबत आकडेवारीसह पूर्ण लेखाजोखा पंडित यांनी राज्यपालांसमोर मांडला. राज्यपालांनी अत्यंत संवेदनशीलतेने सर्व मुद्यावर तपशीलवार चर्चा करून याबत सर्वसमावेशक आराखडा करणार आल्याचे शिष्टमंडळाला सांगितले. तसे निर्देशही त्याच्या सचिवांना दिले. यावेळी विवेक पंडित यांनी राज्यपालांना श्री विठ्लाची मूर्ती आणि रोपं भेट दिली.
या शिष्टमंडळात श्रमजीवी आणि समर्थनचे संस्थापक विवेक पंडित, बाळाराम भोईर, विजय जाधव, दत्तू कोळेकर, सुरेश रेंजड, अशोक सापटे,प्रमोद पवार, ज्ञानेश्वर शिर्के, रुपेश किर, सरिता जाधव, पांडुरंग मालक,संतोष धिंडा,विलास सुरवसे आणि बालरोग तज्ञ डॉ.हेमंत जोशी, डॉ.गोपाळ कडवेकर, डॉ.आशिष भोसले,डॉ.वर्षा भोसले, डॉ.मोहन ढुधाट हे देखील उपस्थित होते.