ठाणे / शिरोशी : माळशेज घाटात एक मोठी व उर्वरित १३ छोट्या दरडी कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. यामुळे सुमारे नऊ दिवसांपासून कल्याण-अहमदनगर या राष्ट्रीय महामार्गावरील घाटातील वाहतूक बंद करण्यात आली होती. ठाणे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर आणि महामार्ग कार्यकारी अभियंता तृप्ती नाग यांच्यात सोमवारी दीर्घकाळ चर्चा होऊन, अखेर सायंकाळी ५ वाजेपासून घाटातील वाहतूक दुतर्फा सुरू करण्यात आली. यंदाच्या पहिल्याच संततधार पावसामुळे या घाटात भलीमोठी दरड नगरकडे तेलाचे पिंप घेऊन जाणाऱ्या ट्रकवर कोसळली होती. या दुर्घटनेतील ट्रकचा चालक अद्यापही बेपत्ता असून, क्लीनरचा मृतदेह दरीत आढळून आला. या दुर्घटनेतील दरडींचा मलबा उचलण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करून, अखेर नऊ दिवसांच्या परिश्रमानंतर घाट वाहतुकीस सुरक्षित असल्याचा निर्वाळा महामार्ग बांधकाम विभागाकडून मिळाल्यानंतर, ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी घाटातील वाहतुकीसाठी संध्याकाळी ५ वाजता ग्रीन सिग्नल दिला. तत्पूर्वी कार्यकारी अभियंत्यांच्या अहवालावरून वाहतूक सुरू करण्यासंदर्भात चर्चा झाली. महसूल विभागाच्या पाहणीतील दुरुस्तीनंतर सोमवारी वाहतूक सुरू झाली. (प्रतिनिधी/वार्ताहर)>अनेक ठिकाणी रस्त्याला भेगादरडी कोसळल्यानंतर घाट बंद ठेवला असला, तरी मुसळधार पावसाने घाटात रस्त्याला अनेक ठिकाणी भेगा पडल्या आहेत. त्यांची तांत्रिक तपासणी करून त्या बुजवणे आवश्यक आहे. शिवाय, संरक्षण भिंतीचे काम निकृष्ट झाल्याचा आरोप पंचायत समिती सदस्या पद्मा गायकर यांनी केला आहे.विद्यार्थ्यांचे नुकसान घाटाखालील टोकावडे, शिरोशी, मुरबाडसह डोळखांब पसिरातील अनेक शालेय विद्यार्थी ओतूर, जुन्नर येथे शिक्षणासाठी जातात. अभियांत्रिकी विभागाच्या विद्यार्थ्यांचाही यात समावेश आहे. नऊ दिवस घाट बंद असल्याने, त्यांचा बराचसा अभ्यासक्रम बुडाला आहे.
माळशेज घाटातील वाहतूक अखेर सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2016 4:56 AM