मालवणमधील राजकोट येथ उभारण्यात आलेला शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेवरून विरोधक आक्रमक झाले आहेत. तसेच या घटनेविरोधात विरोधकांकडून आज मालवणमध्ये निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. दरम्यान, या दुर्घटनेबाबत राज्य सरकारमधील मंत्री दीपक केसरकर यांनी दिलेल्या प्रतिक्रियेविरोधात शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे.
मालवणमध्ये शिवपुतळा कोसळून झालेल्या दुर्घटनेबाबत प्रतिक्र्या देताना वाईटातून काहीतरी चांगलं घडायचं असेल आणि त्यामुळे हा अपघात घडला असेल, असं विधान दीपक केसरकर यांनी केलं होतं. त्यावर टीका करताना संजय राऊत म्हणाले की, दीपक केसरकर यांना जोड्यांनी मारलं पाहिजे आणि लोक त्यांना मारतील. जर शिवराजांचा पुतळा पडला हे बरं झालं, त्यातून काही चांगलं घडेल असं केसरकर यांना वाटत असेल तर ही मिंध्यांनी पोसलेली अफजल खानाची अवलाद आहे. ही घाण आमच्याकडून गेली हे बरं झालं. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला हे बरं झालं, हे शब्द यांच्या तोंडामधून कसे काय बाहेर पडू शकतात, असा संतप्त सवाल संजय राऊत यांनी विचारला.
ते पुढे म्हणाले की, पुतळा पडला हा शुभशकुन आहे, यातून काही चांगलं घडेल, असं हे म्हणतात. किती घाणेरड्या मनोवृत्तीचे लोक देवेंद्र फडणवीस यांनी निर्माण केले. हे देवेंद्र फडणवीस यांचंच पाप आहे. हे छत्रपती शिवाजी महाराजांचे एवढे शत्रू झाले आहेत, हे मला कळत नाही. मिंधे आणि त्यांची टोळी पोसण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी केलं. हे काम नरेंद्र मोदी यांनी केलं. या सगळ्यांनी मिळून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पैसे खाण्यासाठी पाडला, असा गंभीर आरोपही संजय राऊत यांनी केला.