ऑनलाइन लोकमत
डब्लिन, दि. 2 - महाराष्ट्रातील मालवणी माणसाने आज आयरिश भूमीत इतिहास रचला. आज झालेल्या आयर्लंडच्या पंतप्रधानपदाच्या निवडणुकीत मूळच्या मालवणमधील वराड गावातील लिओ वराडकर यांची पंतप्रधानपदी निवड झाली आहे. चुरशीच्या झालेल्या आयरिश पंतप्रधानपदासाठीच्या निवडणुकीत लिओ यांनी शेवटच्या फेरीत 73 पैकी 51 मते घेत बाजी मारली. या निवडणुकीत त्यांनी सिमोन कोवेनी यांचा पराभव केला.
वराडकर यांनी आतापर्यंत आरोग्यमंत्रिपदासह क्रीडा, सांस्कृतिक, वाहतूक अशा महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली आहे. मंत्री लिओ वराडकर हे व्यवसायाने डॉक्टर असून आयर्लंडच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये दोन वेळा निवडून आले आहेत. पंतप्रधान एन्डा केनी यांनी राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर सत्ताधारी फाईन गिल पक्षात त्या पदासाठी सत्तास्पर्धा सुरू झाली होती. त्यात गृहनिर्माणमंत्री सिमोन कोवेनी हे वराडकर यांचे मुख्य स्पर्धक होते.
लिओ गेल्या ३७ वर्षांत ते एकदाही जन्मगावी आलेले नाहीत. मात्र त्यांचे वडील डॉ. अशोक विठ्ठल वराडकर दर दोन वर्षांनी वराड (ता. मालवण) येथे सपत्नीक भेट देतात. लिओ यांना भारतात येण्याची प्रचंड इच्छा आहे. मात्र ते आयर्लंडच्या राजकारणात भरपूर व्यस्त असतात, असे वडील डॉ. अशोक वराडकर यांनी २०१३ साली सांगितले होते. लिओ अद्यापही अविवाहित आहेत. मात्र ते लिओ हे समलिंगी विवाहाचे पुरस्कर्ते आहेत. त्यामुळे आयर्लंडमध्ये तरुण वर्गात ते जास्त लोकप्रिय आहेत.