पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आजपासून दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आल्या आहेत. या दौऱ्यात त्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार होत्या. देशात काँग्रेसच्या नेतृत्वातील विरोधकांची मोट बांधण्यास ममतांचा विरोध आहे. ममता वेगळी चूल मांडण्याच्या तयारीला लागल्या आहेत. नुकत्याच झालेल्या काँग्रेसने बोलविलेल्या विरोधकांच्या बैठकीला तृणमूल काँग्रेसने हजेरी लावली नव्हती.
ममता 1 डिसेंबरला मुंबईतील उद्योजकांशी चर्चा करू शकतात. पीटीआयनुसार ममता बॅनर्जी या उद्योजकांना पश्चिम बंगालमध्ये गुंतवणूक वाढविण्याचे आवाहन करणार आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आहे. यामध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवागी काँग्रेस हे पक्ष आहेत. यामुळे ममता काँग्रेस सोडून राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची तब्येत बरी नसल्याने ममता यांना ते भेटणार नाहीएत. यामुळे शिवसेना खासदार संजय राऊत आणि मंत्री आदित्य ठाकरे ममता यांची आज सायंकाळी भेट घेणार आहेत. यामुळे ममतांना फक्त शरद पवार यांचीच भेट घेऊन माघारी परतावे लागणार आहे.
कसा असेल दौरा..पुढील वर्षी एप्रिल महिन्यात बंगालमध्ये जागतिक व्यापार परिषद भरविण्यात येणार आहे. या परिषदेत अधिकाधिक उद्योजकांनी सहभागी व्हावे, यासाठी प्रयत्न करणार आहेत. मंगळवारी सायंकाळी मुंबईत दाखल झाल्यानंतर सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी जाणार आहेत. या दौऱ्यात शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या मुलीच्या लग्नाच्या स्वागत सोहळ्यालाही उपस्थित राहतील. बुधवारी मुंबईतील उद्योगपतींशी भेटीचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. त्यानंतर शरद पवार यांची भेट घेऊन गुरुवारी कोलकात्याला परतणार आहेत.