- जितेंद्र कालेकर, ठाणे
ममता कुलकर्णी ही आपली एक चांगली मैत्रिण असल्यामुळेच तिच्याकडून आपण व्यवसायासाठी दोन कोटी रुपये घेतले. ती रक्कम आपल्याला एका मोठ्या व्यावयासात गुंतवायची होती, असा दावाही आंतरराष्ट्रीय ड्रग माफीया विकी गोस्वामी याची बहिण रिटा गोस्वामी हिने ठाणे पोलिसांकडे केला आहे.सोलापुरातून हस्तगत केलेल्या करोडो रुपयांच्या इफे ड्रीन प्रकरणी वडोदरा (गुजरात) येथील रिटा आणि तिचा मुलगा दिग्विजय यांची ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस आयुक्त भरत शेळके आणि त्यांच्या पथकाने ४ आणि ५ जुलै रोजी चौकशी केली. या चौकशीत तिने हा दावा केला. रिटाच्या बँक खात्यामध्ये ममताकडून दोन कोटी रुपये वळते झाल्याची माहिती ठाणे पोलिसांना मिळाली होती. त्या पार्श्वभूमीवर तिला ठाण्यात चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स पाठविले होते. गेली दोन दिवस तिच्याकडे अनेक बाबींची चौकशी करण्यात आली. विकी कुठे कुठे ड्रग पाठवितो, कोणा कोणाला याची तस्करी होते इथपासून ममताने नेमके कशासाठी दोन कोटी रुपये दिले? इथपर्यंत अनेक प्रश्नांची तिच्यावर सरबत्ती करण्यात आली. अर्थात, प्रत्येक प्रश्नाला सावधपणे उत्तरे देत तिने पता नहीं, क्या पता? कुछ मालूम नहीं, अशी ठराविक साच्यातील उत्तरे देऊन अनेक प्रश्नांना बगल दिली. मात्र, ममता ही आपली चांगली मैत्रिण असल्यामुळे मैत्रिखातर तिच्याकडे आपण दोन कोटी रुपयांची मागणी केली होती. माझा प्लॉट खरेदी विक्रीचा बिझनेस असून याच बिझनेससाठी तिच्याकडील पैशांमधून गुंतवणूक करण्यासाठी हे पैसे घेतल्याचे तिने सांगितले. त्यात विकीचा कोणताही संबंध नसल्याचे तिने म्हटले आहे. दरम्यान, तिचा मुलगा आणि विकीचा भाचा दिग्विजयचीही चौकशी करण्यात आली. तो गुजरातमधील प्रिन्ट मिडीयात प्रतिनिधी म्हणून कार्यरत असून मामाचा आणि आपला तसा फारसा संबंध नसतो. कधी तरी वर्षातून एक दोन वेळा फोन करुन तो ख्याली खुशाली विचारतो, इतकीच त्रोटक माहिती त्यानेही दिली. अर्थात, दोघांचीही उत्तरे समाधानकारक नसल्यामुळे त्यांना पुन्हा चौकशीला बोलाविण्यात येणार असल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला दिली.विकीविषयी फार माहिती नाहीगेल्या अनेक वर्षांपासून विकीशी थेट भेट झालेली नाही. मात्र, वर्षातून दोन- तीन वेळा तो फोनवरून विचारपूस करतो, इतकी कबुली मात्र तिने पोलिसांना दिली. त्याचा नेमका व्यवसाय कोणता? इफे ड्रीन किंवा कोणत्या ड्रगची तो तस्करी करतो? याबाबत काहीच माहिती नसल्याचा दावाही तिने केला आहे.