ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. 28 - सोलापूरमध्ये छापा टाकून 20 टन इफेड्रीन ड्ग्ज जप्त करणारे ठाणे पोलीस सध्या अभिनेत्री ममता कुलकर्णीचा शोध घेत आहेत. आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ (ड्ग्स) तस्करीमध्ये अभिनेत्री ममता कुलकर्णीचा सहभाग असल्याचा ठाणे पोलिसांना संशय आहे. ममता कुलकर्णीचा पती विकी गोस्वामी अमली पदार्थ तस्करीचा मुख्य सुत्रधार असल्याची माहिती समोर आल्यानंतर पोलीसांनी ममता कुलकर्णीच्या भुमिकेची तपासणी करण्यास सुरुवात केली आहे.
विकी गोस्वामीवर अमली पदार्थ तस्करीप्रकरणी अनेक गुन्हे आहेत. 1997मध्ये अमली पदार्थ तस्करीप्रकरणी दुबईत त्याला अटक करण्यात आली होती. तसंच 15 वर्षांच्या कारावासाची शिक्षादेखील झाली होती. त्यानंतर विकी गोस्वामी ममता कुलकर्णीसोबत केनियाची राजधानी नैरोबी येथे राहायला गेला. केनियामध्येही त्याच्यावर नवे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ड्ग्स तस्करी प्रकरणांमध्ये ठाणे पोलिसांसह अमेरिकेलाही तो हवा आहे. 'हे आंतरराष्ट्रीय रॅकेट असून विकी गोस्वामी महत्वाचा धागा आहे. ममता कुलकर्णीची काय भुमिका आहे याचा तपास करत आहोत', अशी माहिती ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी इफेड्रीन ड्ग्स प्रकरणी बोलताना दिली आहे.
ममता कुलकर्णी सध्या केनियामध्ये असल्याचा संशय आहे. 90 च्या दशकात आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये ममता कुलकर्णीचं नाव घेतलं जायचं. आमीर खान, सलमान खान आणि शाहरुख खान या तिघांसोबतही ममता कुलकर्णीने काम केलं होतं. ठाणे पोलिसांनी ममता कुलकर्णीबद्द्ल जास्त माहिती देण्यास नकार दिला असला तरी सुत्रांच्या माहितीनुसार या अमली पदार्थ प्रकरणाचा ममता कुलकर्णी मुख्य चेहरा असल्याची माहिती मिळत आहे.
विकी गोस्वामी सध्या केनियात असून त्याच्याविरोधात इंटरपोल नोटीस काढलेली असल्याने तो केनिया सोडून जाऊ शकत नाही. यामुळेच त्याने ममता कुलकर्णीला दुबई, सिंगापूर, दक्षिण अफ्रिका आणि अमेरिकेतील आपल्या ग्राहकांना भेटण्यास सांगितले होते अशी माहिती ठाण्याच्या एका पोलीस अधिक-याने दिली आहे.
ममता कुलकर्णीने महाराष्ट्रातदेखील अमली पदार्थ तस्करी केली आहे. विकी गोस्वामी बँकांचे व्यवहार करण्यासाठी ममता कुलकर्णीच्या नावाचा वापर करत होता. अमली पदार्थ तस्करीच्या माध्यमातून मिळालेला पैसा या दोघांनी हवालाच्या सहाय्याने आपल्या बँक खात्यात जमा केला होता. पण ममता आजपर्यंत पोलिसांच्या रडारवर आली नव्हती.
काही दिवसापुर्वी ठाणे पोलिसांनी सोलापूरमध्ये कारवाई करत 20 टन इफेड्रीन जप्त केले होते. ठाणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भारत, पोलंड आणि युरोपातील काहीजण हा माल गुजरातमार्गे मुंबईतून पूर्व युरोपला पाठवण्याची योजना आखली होती.
दरम्यान देश-विदेशात इफेड्रीन या अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या सोलापूरच्या एव्हॉन लाईफ सायन्सेस लि. या कंपनीचा मालक तसेच दोन हजार कोटींच्या या व्यवहारातील प्रमुख आरोपी मनोज जैन (४६) , सल्लागार पुनित श्रींगी (४६) आणि मालाचा देशभरात पुरवठा करणारा हरदीपसिंग इंदरसिंग गिल (४२) या तिघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. ठाणे न्यायालयाने या तिघांचीही रवानगी १४ दिवसांकरिता पोलीस कोठडीत केली आहे.