जितेंद्र कालेकर, ठाणेइफेड्रीन तस्करी प्रकरणात आंतरराष्ट्रीय ड्रगमाफिया विकी गोस्वामी याची बहीण रिटा गोस्वामी (रा. अहमदाबाद) हिला केवळ मैत्रीखातर दोन कोटींची रक्कम दिल्यामुळे अभिनेत्री ममता कुलकर्णी चांगलीच अडचणीत आली आहे. आता हे दोन कोटी केवळ मैत्रीखातर तिने आपल्याला दिल्याचा दावा रिटाने केला असला तरी ममता आणि रिटा यांनी याबाबत आयकर खात्याला कळवले का? त्याबाबतचा योग्य तो कर भरला आहे का? याचीही चौकशी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.गेल्याच आठवड्यात ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमलीपदार्थविरोधी पथकाचे सहायक पोलीस आयुक्त भरत शेळके आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम शेळके यांच्या पथकाने रिटा आणि तिचा मुलगा दिग्विजय यांची कसून चौकशी केली. त्या वेळी तिने पोलिसांना अत्यंत सावधपणे उत्तरे देऊन अनेक प्रश्नांना बगल दिली. अर्थात, आपल्याला बांधकाम व्यवसायासाठी ममताने मैत्रीखातर दोन कोटी रुपये दिल्याची कबुली मात्र तिने दिली. यासंदर्भात तिने आयकर भरणा केला आहे की नाही? तसेच याबाबतची माहिती आयकर विभागाला दिली आहे का? अशा अनेक बाबींची पडताळणी आयकर विभागामार्फत केली जाणार आहे. तर, ममताच्या अंधेरी येथील कार्यालयातून मिळालेल्या पासपोर्ट क्रमांकाच्या आधारे तिचे पॅनकार्डही ठाणे पोलिसांना मिळाले. रिटाशी केलेल्या व्यवहाराची (दोन कोटी) माहिती तिने आयकर विभागाला दिली आहे का? तिचा टीडीएस कापला गेला आहे का? अशा अनेक बाबींची माहिती ही मुंबईच्या मुख्य आयकर विभागातून घेतली जात आहे. तिने जर आयकर भरणा केला असेल, तर त्यात रिटाला दिलेल्या रकमेचा उल्लेख आहे का? नसेल तर या प्रकाराची माहिती आयकर विभागाला मिळाल्यानंतर त्यांच्याकडूनही या दोघींची स्वतंत्रपणे चौकशी होऊ शकते, अशीही माहिती या अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला दिली.
ममता कुलकर्णीच्या संपत्तीची होणार चौकशी
By admin | Published: July 12, 2016 3:54 AM