लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : दोन हजार कोटी रुपयांच्या इफेड्रिन तस्करी प्रकरणी अभिनेत्री ममता कुलकर्णी आणि तिचा पती विकी गोस्वामी यांना ठाणे न्यायालयाने मंगळवारी फरार घोषित केले. त्यामुळे आरोपींची मालमत्ता जप्त करणे आणि त्यांच्याविरूद्ध रेड कॉर्नर नोटीस बजावणे आता शक्य होणार आहे.ठाणे पोलिसांनी वर्षभरापूर्वी एव्हॉन लाईफ सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेडच्या सोलापूर येथील फॅक्टरीवर छापा टाकून २ हजार कोटी रुपयांच्या इफेड्रिनची देश-विदेशात तस्करी करणाऱ्या रॅकेटचा भंडाफोड केला होता. या प्रकरणात ममता कुलकर्णी आणि विकी गोस्वामीचा सहभाग पोलिसांनी न्यायालयासमोर स्पष्ट केल्यानंतर त्यांच्याविरूद्ध तीनवेळा अटक वॉरंट बजावण्यात आले. परंतु, त्याचा उपयोग झाला नाही. त्यामुळे त्यांना फरार घोषित करण्याची मागणी विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी केली. अंमलीपदार्थ विरोधी विशेष न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एच. एम. पटवर्धन यांनी ती मान्य करून ममता कुलकर्णी आणि विकी गोस्वामी यांना फरार घोषित केले. या आदेशामुळे आरोपींच्या चल-अचल मालमत्तेचा शोध घेऊन ती जप्त करण्याची प्रक्रिया पोलिसांना करणे शक्य होणार आहे. याशिवाय आरोपींविरूद्ध रेड कॉर्नर नोटीस बजावण्यासाठी पाठपुरावा करणेही यामुळे शक्य होणार आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी १0 जुलै रोजी होणार आहे.>इफेड्रिन नष्ट करण्यासाठी मागितली परवानगीइफेड्रिनचा साठा नष्ट करण्याची परवानगी सरकारी पक्षाने मंगळवारी न्यायालयाकडे मागितली. सोलापूर येथील एव्हॉन लाईफ सायन्सेसच्या फॅक्टरीमध्ये हा साठा पडून आहे. न्यायालयाने या मुद्यावर १४ जुलै रोजी पुढील सुनावणी ठेवली आहे.
ममता, विकी गोस्वामी फरार
By admin | Published: June 07, 2017 5:10 AM