कोलकाता : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी एका जाहीर सभेत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांंना ‘दीदी’ संबोधून उपस्थितांना आश्चर्याचा धक्का दिला. ममतादीदी आधी काँग्रेसमध्ये होत्या. काँग्रेसच्या मदतीने त्या सत्तेवर आल्या. मात्र नंतर काँग्रेसची साथ सोडली, असे ते म्हणाले. कोलकाता उत्तर व कोलकाता दक्षिण मतदारसंघातील काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ राहुल गांधींची येथील शहीद मिनार मैदानात सभा झाली. ममतादीदींचे आणि माझे जुने संबंध आहेत. त्यांनी माझ्या वडिलांसोबत काम केले आहे. मी त्यांचा आदर करतो. मी त्यांच्याशी प्रेमानेच बोलतो. त्यांचा राग कधीही करीत नाही, असे ते म्हणाले. काही लोकांची समजूत काढणे कठीण असते. आता नरेंद्र मोदी यांचेच बघा. ते कुणाचे ऐकायच्या मनस्थितीतच नाहीत. मी त्यांची समजूत घालू शकत नाही. त्यांची ‘नैय्या’ आता पार झाली आहे. हो, ममतादीदींची समजूत मात्र काढू शकतो, असा चिमटाही त्यांनी काढला. डाव्या पक्षांच्या सरकारसारखीच ममता बॅनर्जी यांची वाटचाल सुरू आहे, अशी टीकाही त्यांनी केली. दीदींना आणखी एक चिमटा काढताना ते म्हणाले, अलिकडे नवी पार्टनरशिप होऊ घातली आहे. ममताजींच्या नावाचे स्पेलिंग केले तर त्यात दोन ‘ एम’ येतात यातला पहिला एम ममतांचा आणि दुसरा ‘एम’ मोदींचा होतो. बाकी तुम्ही समजून घ्या! हा क्रम उलट बाजुनेही होऊ शकतो, असेही ते म्हणाले. राहुल गांधी यांची ही सभा सुरुवातीला पार्क सर्कसवर होणार होती; पण कोलकाता नगरपालिकेने परवानगी नाकारल्यामुळे सभेचे स्थान बदलण्यात आले. परवानगी नाकारल्यानंतर काँग्रसने जोरदार आवाज उठवून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापुढे निदर्शने केली होती. त्यानंतर सभेच्या नव्या जागेला परवानगी देण्यात आली.
ममतांचे काम विरोधक म्हणून चांगले
By admin | Published: May 09, 2014 1:12 AM