मुंबई : कोरोनाच्या काळात आपल्याला ऑक्सिजनचे महत्त्व कळाले, पण आपण निसर्गाने वृक्षांच्या रूपाने दिलेले ऑक्सिजन प्लांट नष्ट करत आहोत. वनांची जपणूक करण्याऐवजी आपण त्यावर हुकूमत गाजवत आहोत अशी खंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी व्यक्त केली.जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. गेल्या वर्षी माझी वसुंधरा अभियानात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि अधिकाऱ्यांचा गौरव यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी वनविभागाच्या बायोसेंटिनल्स ऑफ कोस्टल महाराष्ट्र या कॉफीटेबलचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.विकास कामांचे नियोजन हे निसर्गाचे नियम समजून करणे आवश्यक आहे. अन्यथा निसर्ग त्याच्या पद्धतीने न्याय देण्याचे काम करतो असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, शहरातून हरित तृणांची मखमल आता नाहीशी झाली आहे. आपण पृथ्वीला वसुंधरा म्हणतो आणि तिची गणना स्क्वेअर फुटात करतो. वन बीएचके, टु बीएचके सारख्या तुकड्यांमध्ये ती वाटतो. विकासाचा हा असा हव्यास आपल्या जीवनाला घातक ठरत आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. पर्यावरण रक्षणाच्या कार्यात स्थानिक स्वराज्य संस्थांनी सातत्य ठेवावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
अमृत शहरांत ठाण्याची बाजीअमृत शहरे गटामध्ये ठाणे, नवी मुंबई आणि बृहन्मुंबई महापालिका यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. उत्तेजनार्थ पुरस्कार क्रमांक १ हा पुणे महापालिकेने तर उत्तेजनार्थ पुरस्कार क्रमांक २ हा नाशिक महापालिका आणि बार्शी नगरपरिषद (जि. सोलापूर) यांना विभागून प्रदान करण्यात आला.