अकोला : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सर्वसमावेशक असे साहित्य निर्माण केले. ज्या साहित्यात समाज, देश, राजकारण आणि विकासाचा विचार मांडलेला आहे, असे साहित्य राष्ट्रसंतांनी लिहिले आणि समाजासमोर मांडले; परंतु सद्य:स्थितीत माणूस भौतिक संपत्तीच्या मागे धावत आहे. माणसातील माणूसपण हरवत आहे. त्यामुळे माणूस घडविण्याचे साहित्य निर्माण व्हायला हवे, असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक आणि अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष वसंत आबाजी डहाके यांनी येथे केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवा समितीतर्फे स्वराज्य भवन प्रांगणातील ऋषिवर्य घुसरकर महाराज साहित्य नगरीमध्ये शनिवारपासून सुरू झालेल्या चौथ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्ष म्हणून ते बोलत होते. संमेलनाचे उद्घाटन कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी केले. या वेळी ग्रामगीता विचारपीठावर खासदार संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.वसंत डहाके म्हणाले, प्रेरणादायी आणि बोध देणारे साहित्य राष्ट्रसंतांनी निर्माण केले. अंधश्रद्धेवर प्रहार करून समाजाला जागे करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. देशभक्ती जागविण्यासाठीसुद्धा भजने, साहित्याचा आधार घेतला. त्यामुळेच त्यांचे साहित्य जगात पोहोचले, असे त्यांनी सांगितले. राज्याराज्यांमध्ये पाण्यावरून वाद होत आहे. माणसातील माणूसपण हरवत चालले आहे. त्यासाठी नवोदित साहित्यिकांनी पुढे आले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. (प्रतिनिधी)
माणूस घडविण्याचे साहित्य निर्माण व्हावे - डहाके
By admin | Published: January 29, 2017 12:19 AM