अकोला, दि. २८- राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सर्वसमावेशक असे साहित्य निर्माण केले. त्यांच्या साहित्यामध्ये सौंदर्य आणि समाजासाठीची उपयुक्ततासुद्धा आहे. साहित्य हे पुस्तकातून शिकण्याची गोष्ट नव्हे. आंतरमनातून साहित्य जन्माला येते. ज्या साहित्यात समाज, देश, राजकारण आणि विकासाचा विचार मांडलेला आहे, असे साहित्य राष्ट्रसंतांनी लिहिले आणि समाजासमोर मांडले; परंतु सद्यस्थितीत माणूस भौतिक संपत्तीच्या मागे धावत आहे. माणसातील माणूसपण हरवत आहे. त्यामुळे माणूस घडविण्याचे साहित्य निर्माण व्हायला हवे, असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक आणि अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष वसंत आबाजी डहाके यांनी येथे केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवा समितीतर्फे स्वराज्य भवन प्रांगणातील ऋषिवर्य घुसरकर महाराज साहित्य नगरीमध्ये शनिवारपासून सुरू झालेल्या चौथ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्ष म्हणून ते बोलत होते. संमेलनाचे उद्घाटन कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी केले. यावेळी ग्रामगीता विचारपीठावर खासदार संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, गुरुदेव सेवा मंडळाचे आजीवन प्रचारक आचार्य हरिभाऊ वेरूळकर गुरुजी, गुरुकुंज आश्रमाचे सर्व सेवाधिकारी प्रकाश महाराज वाघ, जैव राष्ट्रसंत जनसाहित्यिक डॉ. सुभाष सावरकर, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष अशोक पटोकार, रमेशचंद्र सरोदे, किसन पारिसे, महादेवराव भुईभार, माजी महापौर सुमन गावंडे व प्राचार्य संगीता बघेले आदींची प्रमुख उपस्थिती होती. वसंत डहाके बोलताना म्हणाले, बालपणी माझाही राष्ट्रसंतांशी संबंध आला. त्यांची भजने मी वाचली. ग्रामगीता वाचल्यावर त्यांनी काळाचा, परिस्थितीचा विचार करून साहित्य लिहिले. प्रेरणादायी आणि बोध देणारे साहित्य राष्ट्रसंतांनी निर्माण केले. त्यांच्या साहित्यामध्ये समाजाची जडणघडण, ग्रामविकास, स्वच्छता, राजकारण, देशाच्या विकासाबाबत भाष्य आहे. अंधश्रद्धेवर प्रहार करून समाजाला जागे करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. देशभक्ती जागविण्यासाठीसुद्धा भजने, साहित्याचा आधार घेतला. त्यामुळेच त्यांचे साहित्य जगात पोहोचले. सुंदर आणि उपयुक्त असे साहित्य राष्ट्रसंतांनी समाजासाठी निर्माण केले, असे त्यांनी सांगितले. राज्याराज्यांमध्ये पाण्यावरून वाद होत आहे. माणसातील माणूसपण हरवत चालले आहे. त्यामुळेच समाजाला उपयुक्त अशा साहित्याची गरज आहे. त्यासाठी नवोदित साहित्यिकांनी पुढे आले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन श्रीकृष्ण पखाले यांनी केले. आभार प्रा. डॉ. राजीव बोरकर यांनी मानले. ग्रामगीता जीवन गौरव पुरस्कार प्रदानराष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनामध्ये भजनसम्राट स्व. रामभाऊ गाडगे स्मृतिप्रीत्यर्थ ग्रामगीता जीवन गौरव पुरस्कार हभप रामधन महाराज, डॉ. भास्करराव विघे यांना कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर, खासदार संजय धोत्रे यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. तसेच शासनाचा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त प्रा. गोपाल मानकर, श्रीकृष्ण डांबलकर यांचा सत्कार करण्यात आला.सेंद्रिय शेतीसाठी शेतकर्यांना अनुदान: कृषी मंत्री फुंडकरराष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा मी एक कार्यकर्ता आहे. राष्ट्रसंतांनी गोरगरीब, दु:खी, कष्टी समाजाचा विचार केला. ग्रामविकास आणि शेतीचा विकास त्यांनी ग्रामगीतेतून मांडला; परंतु थोडेबहुत राजकारणीच समाजकारण करताना दिसतात. ग्रामगीता वाचून राजकारण केले तर राष्ट्रसंतांना अपेक्षित समाज, राष्ट्र घडेल. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सेंद्रिय शेतीचा ग्रामगीतेतून पुरस्कार केला आहे. त्यामुळे राज्यात सेंद्रिय शेतीचा कसा विकास होईल आणि क्षेत्र कसे वाढेल, यादृष्टीने आपण प्रयत्न करू. सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी शेतकर्यांना अनुदान उपलब्ध करून देऊ, असे मत कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी व्यक्त केले.
माणूस घडविण्याचे साहित्य निर्माण व्हावे: वसंत आबाजी डहाके
By admin | Published: January 29, 2017 2:32 AM