मुंबई - मुंबई-पुणे महामार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना आता अधिक दक्षतेने वाहतूक नियमांचे पालन करावे लागणार आहे. सुरक्षा मोहिमेनुसार आठवडाभर समुपदेशन केल्यानंतर आता कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, वाहनांमध्ये चालकांसह सहप्रवाशांनी सीटबेल्ट परिधान केला नसल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.
यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर १ डिसेंबरपासून परिवहन विभागाने सुरक्षा मोहीम सुरू केली आहे. २४ तास सहा महिने ही मोहीम सुरू राहणार आहे. समुपदेशन आणि जनजागृतीला महामार्गावरील वाहन चालकांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे. जनजागृती केल्यानंतर अनेक वाहन धारकांकडून नियमांचे पालन करण्यात येत आहे. एसटी महामंडळ, मालवाहतूकदार, खासगी बसचालकांनी देखील वाहतूक नियमांचे पालन करताना दिसत आहेत.