ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 28 - पुरुषांवर होणारे कौटुंबिक अत्याचार, महिलांकडून कौटुंबिक हिंसाचार कायद्याचा होणारा गैरवापर याविरोधात ‘मेन्स राइट असोसिएशन’च्या वतीने मेणबत्ती मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. संभाजी उद्यानामधून निघालेला हा मोर्चा गुडलक चौकामध्ये संपला. या वेळी मेणबत्त्या पेटवून दिग्दर्शक अतुल तापकीर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
तापकीर यांनी नुकतीच पत्नी व तिच्या कुटुंबीयांकडून होणा-या छळाला कंटाळून आत्महत्या केली आहे. या मोर्चामध्ये साधारणपणे दिडशे ते दोनशे पुरुष सहभागी झाले होते. संभाजी उद्यानामधून निघालेला हा मोर्चा जंगली महाराज रस्त्याने गुडलक चौकामध्ये आला. पांढ-या रंगाचे टी शर्ट घातलेले पुरुष हातामध्ये फलक घेऊन उभे होते. या फलकांवर कौटुंबिक हिंसाचार कायद्याचा गैरवापर हे दहशतवादी कृत्य आहे, पुरुषांविरुद्ध होत असलेल्या अन्यायाविरुद्ध महिलांनीही पेटून उठावे, असे आवाहन करणारी वाक्य लिहिलेली होती.
महिलांकडून पुरुषांविरुद्ध होणारा कायद्याचा गैरवापर भारतीय कौटुंबिक व्यवस्था खिळखिळी करीत असून खोट्या गुन्ह्यांमुळे मुलांची वाताहत होत आहे. ज्येष्ठ नागरिकांना कोणताही दोष नसताना अटक केली जात असल्याचे असोसिएशनचे महेश शिंदे, पिनाकी लोहकरे, चेतन शर्मा यांनी सांगितले. शासनही याविषयावर गंभीर नाही. अनेक पुरुष समाजामध्ये बदनामीच्या भितीने अत्याचार गुपचूप सहन करीत आहेत. या वेळी सर्वांनी मेणबत्त्या पेटवून दिग्दर्शक अतुल तापकीर यांना श्रद्धांजली वाहून त्यांना न्याय देण्याची मागणी केली. यावेळी तापकीर यांचे कुटुंबियही उपस्थित होते.