मध्यप्रदेशातून होतेय मांडूळ सापाची तस्करी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2018 04:16 PM2018-12-16T16:16:16+5:302018-12-16T16:17:10+5:30
तस्करीचे कनेक्शन मेळघाट ते नागपूर : अचलपूर ते आसेगाव दरम्यान सात दलालांना अटक
- अनिल कडू
परतवाडा (अमरावती) : मध्यप्रदेशातून-महाराष्ट्रात होत असलेल्या मांडूळ सापाच्या तस्करीबाबतचे मेळघाट ते नागपूर कनेक्शन पूर्व मेळघाट वनविभागाच्या हाती लागले आहे. यात अचलपूर ते आसेगाव दरम्यान सात दलालांना वनविभागाने ताब्यात घेतले आहे. यातील एक नागपूर जिल्ह्यातील, तर दुसरा यवतमाळ जिल्ह्यातील आहे. उर्वरित अमरावती जिल्ह्यातील आहेत.
मांडूळ सापाबाबतची यू ट्यूबवरील माहिती आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय किंमत बघून हे सातही लोक मांडूळ सापाच्या तस्करीत दलाल म्हणून अडकले आहेत. साडेतीन ते चार किलो वजनाच्या या सापाच्या तस्करीत यांना लाखो रूपये दलालीपोटी मिळणार होते. यातील तिघांना त्यांच्या स्कुटीसह आसेगाव लगतच्या पेट्रोलपंपवरून, तर चौघांना त्यांच्या कारसह आसेगाव बसस्टँडवरून वनविभागाने ताब्यात घेतले. यांना शुक्रवारी अचलपूर न्यायालयापुढे उभे करून त्यांची मंगळवारपर्यंत वनकोठडी वनविभागाने मिळविली.
११ डिसेंबरला मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत चिखलदरा वनपरिक्षेत्राधिकारी यांनी स्कॉर्पिओ वाहन क्रमांक एमएच ०४ बीके ४७५१ मधून मांडूळ सापासह शेख इम्रान शेख इकबाल (३१, रा. गौलखेडा बाजार, ता. चिखलदरा) आणि तनवीर खान शरीफ खान (३८, रा. धारणी) यांना अटक केली. १४ डिसेंबरपर्यंत वनकोठडी घेतली. स्कॉर्पिओ जप्त केली आणि प्रकरण पूर्व मेळघाट वनविभागाकडे हस्तांतरित केले. मध्यप्रदेशातील बºहाणपूर येथून मांडूळ सापासह निघालेली ही स्कॉर्पिओ गाडी ११ डिसेंबरला चिखलदरा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहाजवळ थांबली. तेथून ती परतवाड्याकडे येत असताना ब्रम्हासती नाल्यावर आमझरी वर्तुळात वनाधिकाºयांनी पकडली होती.
पूर्व मेळघाट वनविभागाने दोन्ही आरोपींना अचलपूर न्यायालयापुढे १४ डिसेंबरला उभे करून वनकोठडी वाढवून घेतली. यातील शेख इम्रान शेख इकबाल याला १७ डिसेंबरपर्यंत वनकोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. या चौकशीत शेख इम्रान शेख इकबाल यालाच पुढे करून त्याच्या मोबाईलच्या माध्यमातून त्या सात दलालांना अटक केली आहे. साडेतीन ते चार किलो वजनाच्या मांडूळ सापाचे हे दलाल आरोपी शेख इम्रान यास तीन लाख रुपये देणार होते आणि नागपूर येथील तस्कराला पुरविणार होते.
प्राप्त माहितीनुसार, मांडूळ सापाच्या तस्करीत तीन ते चार किलोच्या सापालाच अधिक महत्त्व आहे. यापेक्षा कमी वजनाच्या सापाला कुणीही विकत घेत नाही. तस्करी करीत नाही. हा एक बिनविषारी साप आहे. यालाच दुतोंड्या साप म्हणतात. हा साप पहिले सहा महिने एका तोंडाने खातो आणि दुसºया तोंडाकडून चालतो. नंतरच्या सहा महिन्यात दुसºया तोंडाने खातो आणि पहिल्या तोंडाकडून चालतो. एकाच वेळेत दोन्ही तोंडाचा तो वापर करू शकत नाही.
काय आहेत अंधश्रद्धा?
इंडोनेशिया, युरोप आणि चायनामध्ये या सापाला अधिक महत्त्व आहे. परंपरागत शक्तीवर्धक आणि कामवासना उत्तेजित करणाऱ्या औषधांमध्ये त्याचा वापर होतो. देशपातळीवर या सापाची किंमत ५ ते १० लाख असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर याची किंमत तीन ते पंचवीस कोटी आहे. या सापाविषयी अनेक अंधश्रद्धा जोपासल्या गेल्या आहेत. हा साप धनशक्तीची देवता असून त्याचे सुबेरासोबत नाते आहे. याच्या दर्शनाने धनशक्तीत वाढ होते, असा गैरसमज असून, तंत्र-मंत्र विद्येतही याचे अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे सांगितले जात आहे.