मुंबई : संगीताचा कार्यक्रम सलग २००० प्रयोगाचा पल्ला गाठू शकतो ही तशी दुर्मिळ गोष्ट. मराठी संगीत, संस्कृती आणि लोककलेचा चालता-बोलता इतिहास एका कार्यक्रमातून दोन हजार प्रयोगापर्यंत नेण्याचे श्रेय चौरंगचे सर्वेसर्वा अशोक हांडे यांचे. मंगळवारी ८ आॅगस्टला हा विक्रम मुंबईत होणार आहे.ज्ञानेश्वरांच्या ओम् नमोजी आद्या...ने मराठी भाषेची सुरुवात झाली. विठ्ठलाच्या भक्तीने महाराष्टÑात संतकाव्य फुलले. वामन पंडित, मोरोपंत यांनी पंतकाव्य आणले. शिवाजी महाराजांच्या काळात वीरश्रीचा अंगार फुलला. शाहिरी काव्य, पोवाडे सुरू झाले. पेशवाईत लावणी आली. शेता-वावरात आणि अंगणात संगीत फुलू लागले. भूपाळीपासून गवळणीपर्यंत महाराष्टÑ गीत-संगीताच्या साथीने बहरत गेला. नाट्यसंगीत, भावगीते, सुगम संगीत, चित्रपट गीते असा अलौकिक प्रवास रोंबासोंबा संगीतापर्यंत झाला. तो रंगमंचावर आणण्याचे धाडस ३१ वर्षांपूर्वी हांडे यांनी केले.१०० लोकांचा संच घेऊन कार्यक्रम सुरू झाला, तेव्हा सगळ््यांनी त्यांना वेड्यात काढले. एवढा मोठा कार्यक्रम कौतुकाने पाच-पन्नास प्रयोगापर्यंत चालेल, असे लोकांना वाटले. पण महाराष्ट्राची संगीत परंपरा, संस्कृती, इतिहास जगभर गेला. नव्या पिढीला तीन तासांत हा इतिहास बसल्या जागी कळू लागला. जात्यावरच्या ओव्या काय आहेत, हे मुलांना सांगण्याची गरज त्यांनी पूर्ण केली.मंगलगाणी, दंगलगाणीचा ५०० वा प्रयोग दिल्लीत तत्कालिन गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या उपस्थितीत ५ सप्टेंबर १९९२ साली झाला, तर १५०० वा प्रयोग शिकागोला स्वामी नारायण मंदिर समितीतर्फे झाला. अशोक हांडे यांना याच अभूतपूर्व कामामुळे यावर्षीचा ‘लोकमत महाराष्टÑीयन आॅफ द इयर’ पुरस्कारही गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत मिळाला. मंगलगाणीचे यश खणखणीत बंद्या रुपयासारखे आहे.संगीताचे डॉक्युमेंटेशनभूपाळी, भजन, भारूड, शेतकरी नृत्य, लावणी, पोवाडा, झिम्मा फुगडीपासून नाट्यसंगीत, भावगीते, सिनेमाची गाणी हे संगीत नव्या पिढीला समजावणे सोपे झाले. हांडे यांनी केलेल्या डॉक्युमेंटेशनचे मोल कितीतरी अधिक आहे.
मंगलगाणी नाबाद २०००..! मंगळवारी होणार प्रयोग
By अतुल कुलकर्णी | Published: August 07, 2017 4:31 AM